तुम्ही कधी कोर्टात गेले नसाल तरी सिनेमांमधून हे पाहिलंच असेल की, वकील हे नेहमी पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाच्या कोटात दिसतात. हीच त्यांची ओळख झाली आहे. पण वकिलांचा हा ड्रेस कोड ठरला कसा? किंवा ते पांढरा शर्ट आणि काळा कोटच का वापरतात? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. अनेकांना वाटत असेल की, ही फॅशन आहे. पण तसं नाहीये. याचं कारण जाणून घेऊ....
१३२७ मध्ये एडवर्ड तृतीयने न्यायाधिशांची वेशभूषा ठरवली होती. त्यावेळी न्यायाधिशांच्या डोक्या वर एक विग वापरला जात होता. वकीलीच्या सुरूवातीच्या काळात वकिलांना चार भागांमध्ये विभाजित करण्यात आले होते. विद्यार्थी, प्लीडर(वकिल), बेंचर आणि बॅरिस्टर अशी विभागणी करण्यात आली होती. हे सगळे न्यायाधिशांचं स्वागत करत होते.
त्यावेळी कोर्टात सोनेरी लाल रंगाचे कपडे आणि भुरक्या रंगाचा गाउन वापरा जात होता. त्यानंतर १६०० मध्ये वकिलांच्या वेशभूषेत बदल आला आणि १६३७ मध्ये असा प्रस्ताव ठेवला गेला की, काउन्सिल्सनी जनतेनुसारच कपडे परिधान करावे. त्यानंतर वकिलांनी लांब गाउन वापरण्यास सुरूवात केली होती. असेही मानले जाते की, त्यावेळची वेशभूषा न्यायाधीश आणि वकिलांना इतर व्यक्तींपासून वेगळं ठरवते.
पुढे १६९४ मध्ये ब्रिटनची राणी क्वीन मेरी यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांचे पती राजा विलियम्स यांनी सर्वच न्यायाधीश आणि वकिलांना सार्वजनिक रूपाने शोक व्यक्त करण्यासाठी काळे गाउन परिधान करून एकत्र येण्याचा आदेश दिला. हा आदेश कधीच रद्द केला गेला नाही. ज्यानंतर आजपर्यंत ही प्रथा चालत आली आहे की, वकील काळा कोट घालतात.
आता तर काळा कोट वकिलांची ओळख झाली आहे. अधिनियम १९६१ नुसार, कोर्टात पांढरा बॅंड टायसोबत काळा कोट घालून येणे अनिवार्य करण्यात आलं होतं. असे मानले जाते की, या काळ्या कोटमुळे आणि पांढऱ्या शर्टमुळे वकिलांमध्ये एक शिस्त येते आणि त्यांच्या न्यायाप्रति विश्वास रूजतो.