चिल्लर पैशाची बचत करण्यासाठी आपल्यापैकी अनेकांनी पिग्गी बॅंकचा वापर केला असेल. स्वत: नसेल केला तर आपल्या लहान मुलांना तरी ते दिले असेल. अनेकदा तुम्ही डुकाराच्या आकारातील पिग्गी बॅंक पाहिले असतील. पण कधी विचार केलाय का की, हे पिग्गी बॅंक डुकराच्या आकाराचे का असतात? किंवा यांना पिग्गी बॅंक असंच का म्हटलं जातं?
या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नक्कीच नसेल. पण आम्ही तुम्हाला आज या प्रश्नाची उत्तरं देणार आहोत. यासाठी आपल्याला जरा काही वर्षे मागे जावं लागेल. १५व्या शतकात यूरोपिय देशातील घरांमध्ये धातू किंवा काचेची भांडी वापरली जात नव्हती. धातू महाग होते. त्यामुळे त्यावेळी भांडी तयार करण्यासाठी केशरी रंगाच्या मातीचा वापर केला जात होता. या मातीला PYGG म्हटले जात होते. तुम्ही म्हणाल याचा काय संबंध?
तर याचं कारण हे की, त्यावेळी बॅंक नव्हत्या. अशात घरातील महिला आणि पुरुष मातीच्या भांड्यांमध्ये पैसे ठेवत असत. त्यावेळी या भांड्याला Pygg Bank किंवा Pygg Jar म्हटले जात होते. अनेक वर्ष हेच चलन होते. नंतर धातूची भांडी आली. घरांमध्ये मातीची भांडी कमी दिसू लागली. पण तरीही पिग्गी बॅंक हेच बचत करण्याचं माध्यम होतं.
आणखी एक मजेदार गोष्ट म्हणजे आजच्या पिग्गी बॅंक किंवा मडक्यांप्रमाणे तेव्हाही पिगी बॅंक उघडण्याची सुविधा नव्हती. म्हणजे पैसे टाकण्यासाठी एक छोटीशी जागा असायची आणि पैसे काढताना ते थेट तोडावेच लागत होते. अर्थातच याला झाकण देण्यात आलं असतं तर त्यातून सहज कधीही पैसे काढता आले असते. धातूच्या भांड्याना तोडणे कठीण आणि खर्चिकही होते. त्यामुळे मातीपासून तयार ही मडकी चलनात येऊ लागली.
१९व्या शतकात जेव्हा बाजारात धातूच्या भांड्यांनी कब्जा मिळवला तेव्हाही लोकांची Pygg Bank ला मागणी होती. आता तर घरातील मोठ्यांसोबतच लहान मुलंही पिग्गी बॅंकचा वापर करु लागले होते. असे सांगितले जाते की, लहान मुलांना पिग्गी बॅंककडे आकर्षित करण्यासाठी काही कुंभारांनी त्यावेळी डुकराच्या आकाराच्या पिग्गी बॅंक तयार करण्यास सुरुवात केली. लहान मुलांना हे फार आवडलं आणि याची मागणी वाढली.
आता काही पिग्गी बॅंकचा केवळ आकाराच नाही तर Pygg बॅंक आता Piggy ही झालं आहे. तेव्हापासून आता याला सगळेजण पिग्गी बॅंक म्हणू लागले आहेत. आता आधुनिक जगात याच्या वेगवेगळ्या डिझाईन आल्या असल्या तरी डुकराच्या डिझाईनची पिगी बॅंकबाबत आजही अनेकांना आकर्षण आहे.
अजूनही काही पाश्चिमात्य देशांमध्ये लोक एकमेकांना भेटवस्तू म्हणून पिग्गी बॅंक देतात. याला शुभही मानलं जातं. बेबीलॉनच्या खोदकामात काही पिग्गी बॅंक मिळाले होते. तर ग्रीकमधील खोदकामात काळ्या रंगाचे पिग्गी बॅंक मिळाले होते.