सेफ्टी पिनचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. महिलांच्या पर्समध्ये हमखास सेफ्टी पिन असतेच. सेफ्टी पिन या नावात 'सेफ्टी' हा शब्द आहे. सुरक्षित ठेवण्याव्यतिरिक्त अनेक प्रकारे याचा वापर होतो. एका तारेने बनवलेली ही छोटीशी वस्तू आपण सतत वापरतो पण तिच्या शोधाबद्दल आपल्याला काहीही माहिती नसतं. अचानक गरजेच्या वेळी मदतीला येणारी ही सेफ्टी पिन छोटी असली तरी अत्यंत उपयोगी आहे. तिचा जन्मही नेमका कसा झाला. त्याची कथाही अगदी मनोरंजक आहे. या सेफ्टी पिनचा शोध का आणि कोणी लावला हे जाणून घेऊया...
सेफ्टी पिनचा शोध लावला वॉल्टर हंट (Walter Hunt) यांनी लावला. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी शोधण्यासाठी ते प्रसिद्ध होते. वॉल्टर हंट यांच्यावर खूप कर्ज होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी एखाद्या नवीन गोष्टीच्या ते शोधात होते. एखादी नवीन गोष्ट विकसित करायची आणि त्याच्या विक्रीतून पैसे कमावून कर्जफेड करण्याचा त्याचा विचार होता. यातूनच त्यानं सेफ्टी पिनची निर्मिती केली. मीडिया अहवालानुसार, असं म्हटलं जातं की त्याच्या पत्नीच्या ड्रेसचं बटण तुटलं होतं, त्या वेळी त्यानं एका तारेचा वापर करून बटणाची गरज भागवली. यानंतर त्यानं तारेपासून ही सेफ्टी पिन बनवली. तिला ड्रेस पिन (Dress Pin) असं म्हटलं जात असे.
वॉल्टर हंटच्या जेव्हा लक्षात आलं, की ही छोटीशी गोष्ट अत्यंत उपयुक्त आहे, तेव्हा त्यांनी या पिनसाठी घेतलेलं पेटंट 400 डॉलर्सना विकलं. वॉल्टर हंट यांनी सेफ्टी पिनसह पेन, चाकूला धार करण्याचं उपकरण, स्पिनर अशा विविध गोष्टींचा शोध लावला. शिलाई मशीनही त्यांनीच तयार केली आहे. या ड्रेस पिनचा वापर अनेक ठिकाणी होऊ लागला. तारांच्या ऐवजी या पिनचा वापर केला जाऊ लागला. यामुळे बोटांना होणारी दुखापत खूप कमी झाली होती.
लोकांची बोटं या पिनमुळे सुरक्षित राहू लागली. त्यामुळं ड्रेस पिन हे नाव मागं पडलं आणि सेफ्टी पिन हे नाव लोकप्रिय झालं. ड्रेस पिनऐवजी अन्य अनेक प्रकारे या पिनचा वापर केला जातो. आज भारतीय पारंपरिक पोशाख असणाऱ्या साडीसाठी तर ही सेफ्टी पिन अत्यंत महत्त्वाची बाब आहे. याशिवाय अनेक ठिकाणी वापर केला जाणारी ही सेफ्टी पिन छोटीशी असली तरी काम फार मोठं करत आहे, यात शंका नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.