भारतीय रेल्वे जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. तुम्हीही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेने प्रवास करताना तुम्ही पाहिलं असेल की, स्टेशनवर त्या स्टेशनच्या नावाचं बोर्ड असतं. स्टेशन लहान असो वा मोठं सगळीकडे तुम्हाला पिवळ्या रंगाचे बोर्ड दिसतात. या स्टेशनचं नाव हिंदी, इंग्रजी, मराठी आणि कधी उर्दूत लिहिलेलं असतं. स्टेशनच्या नावाखाली आणखी काही लिहिलेलं असतं. ते म्हणजे स्टेशनची समुद्र सपाटीपासून उंचीही लिहिलेली असते.
तुम्ही विचार केलाय का की, स्टेशनच्या नावाच्या बोर्डवर ही उंची का लिहिलेली असते? तसं पहायला गेलं तर तशी ही एक छोटीशी बाब आहे. मात्र, रेल्वे चालकासाठी महत्वाची भूमिका बजावते. चला तर जाणून घेऊ यामागचं कारण...
रेल्वे ट्रॅक तयार करताना या गोष्टीची काळजी घेतली जाते की, ट्रॅकचा उतार फार जास्त असू नये. समुद्र सपाटीच्या उंचीच्या आधारावर ट्रॅकचा उतार ठरवला जातो. याने रेल्वेला सहजपणे धावण्यास मदत मिळते आणि दुर्घटना होण्याचा धोका कमी असतो.
जर एखादी रेल्वे उंचीवर जात असेल तर इंजिनाला जास्त मेहनत करावी लागते. त्याचप्रमाणे जेव्हा एखादी रेल्वे उतारात धावत असेल तर इंजिनाला ब्रेक लावावा लागतो. समुद्र तळाच्या उंचीच्या माहितीने इंजिनच्या ड्रायव्हरला हे जाणून घेण्यास मदत मिळते की, त्यांना किती स्पीडने धावायचं आहे किंवा किती ब्रेक लावायचा आहे.
त्याशिवाय समुद्र तळाच्या उंचीच्या मदतीने रेल्वेच्या वर लागलेल्या विजेच्या तारांना एक समान उंची देण्यासही मदत मिळते. जेणेकरून विजेचे तार रेल्वेच्या तारांसोबत सतत चिकटून रहावे.