हिवाळ्यात (Winter) थंडीपासून (Cold) बचाव करण्यासाठी लोकरीचे कपडे वापरले जातात. हे कपडे थंडीपासून केवळ आपला बचावच करत नाही, तर ते खूप क्लासी असतात. विशेषतः थंडीच्या दिवसात वापरल्या जाणाऱ्या टोप्यांचा (Cap) विचार केला तर या टोप्यांवर; पॉम-पॉम (लोकरीचा गोंडा किंवा बॉल) तुमचं नक्कीच लक्ष वेधून घेतील. आकर्षक सजावट असलेले हे लोकरीचे पॉम-पॉम (POM-POM) नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे.
आपल्याकडे टोप्या असल्या तरी दुकानांबाहेर विक्रीसाठी लावलेल्या विविधरंगी टोप्या बघून त्या खरेदी करण्याचा मोह नक्कीच होतो. सर्व टोप्यांच्या वरच्या बाजूस टोकावर पॉम-पॉम (गोंडे) का लावलेले असतात, याविषयी फार कमी लोकांना माहिती असते. तुमचं लक्ष या पॉम-पॉमवर गेलं असेल तर कदाचित ते सजावटीसाठी लावले असावेत असं तुम्हाला त्याक्षणी वाटलं असेल. परंतु, त्याचा अर्थ असा नाही.
प्रत्येक टोपीवर एकसारखीच सजावट का केली जाईल? याचाच अर्थ प्रत्येक टोपीवरती लोकरीचे गोंडे लावले जातात, यामागे काही तरी विशेष कारण आहे हे नक्की. टोप्यांवर असे पॉम-पॉम लावण्याची परंपरा खूप जुनी आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वीदेखील टोप्यांवर आकर्षक आणि सुंदर अशी सजावट केली जात असे.
विविध फुलांचे आकार कापून, त्याने टोपीवर सजावट करण्याची प्रथा वायकिंग काळापासून (Viking Era) सुरू असल्याचं मानलं जातं. इतकंच नाही तर एका पौराणिक मान्यतेनुसार, फ्रेयर नावाची देवता आपल्या डोक्यावर पॉम-पॉम असलेलं संरक्षक कवच परिधान करत असे. स्वीडनमध्ये (Sweden) सापडलेल्या एका पुतळ्यावर ही बाब दिसून आली. काही युरोपीय देशांमध्ये टोप्यांवरच्या पॉम-पॉमचा रंग त्या व्यक्तींची रॅंक दर्शवतो. पाद्री (Pastor) त्यांचे पद दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे पॉम-पॉम असलेल्या टोप्या परिधान करतात.
`द आइटलाइन`ने दिलेल्या वृत्तानुसार, काही तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारची टोपी एक प्रकारचं सुरक्षा कवच मानली जाते. नेपोलियनच्या काळात लष्करी गणवेशावरही अशा पद्धतीचे लोकरीचे गोंडे अर्थात बॉबल्स लावले जात असत. त्यामुळे अरुंद ठिकाणी असलेल्या सैनिकांच्या डोक्याला दुखापत होत नसे. आकर्षक सजावट असलेल्या या टोप्या कमी किमतीत मिळत असल्याने मंदीच्या काळातही त्यांना मोठी मागणी होती. याशिवाय या टोप्यांचा ट्रेंड वाढवण्यात मंकीज मायकेल नेस्मिथ बॅंडमधील (Monkees’ Michael Nesmith Band) सदस्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे पॉम-पॉम ही केवळ सजावट नाही तर त्यामागे मोठा इतिहास दडलेला आहे.