टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला खेळाडू वेटलिफ्टर मीराबाई चानू , बॅडमिंटनपटू पी. व्ही सिंधू, बॉक्सर लवलीना बोरगोहेन यांनी पदके जिंकत देशाची मान उंचावली. टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनपटू सानिया नेहवाल यांनी ही आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या खेळाची जादू दाखवली. पण या आहेत सध्याच्या काळातील महिला. १९३५ साली महाराष्ट्रात काष्टी साडी नेसून कोणी टेबल टेनिस खेळलं असावं याचा विचार आताच्या शतकातही शक्य नाही. पण असं झालं आहे. खुद्द इतिहास याचा साक्षीदार आहे. तुम्हाला पटत नसेल, विश्वास बसत नसेल तर हा फोटो पाहाच.
ट्विटरवर @Paperclip_In या अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. द पेपरक्लिप (The Paperclip) या संकेतस्थळाचे हे ट्विटर हँडल आहे. हा फोटो १९३५ सालचा असून यात दोन मराठी महिला काष्टी साडी नेसून टेबल टेनिस खेळत आहेत. या फोटोसोबत करण्यात आलेल्या ट्वीट्समध्ये या फोटो मागची रंजक माहितीही देण्यात आली आहे. हा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार १९ व्या आणि २० व्या शतकाच्या सुरुवातीला भारतात विधवा महिला आणि विधवा माता आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी लोकांच्या घरी स्वयंपाक करण्याचे काम करायच्या. कारण त्यांच्याकडे दुसरे कोणते कौशल्य नव्हते. इतिहासातील थोर स्त्रीवादी आणि समाजसेविका रमाबाई रानडे यांनी पुणे येथे स्वातंत्र्यपुर्व काळात या पीडीत आणि गरजू विधवा महिलांसाठी पुणे सेवा सदनची स्थापना केली. यामध्ये त्या या महिलांना नर्सिंग आणि इतर कौशल्यांचे शिक्षण दिले जायचे. त्याकाळातील समाजातील सनातनी आणि जुनाट विचारांवर हा प्रहार होता. त्या महिलांना हस्तकौशल्य, तंत्रज्ञान याचेही प्रशिक्षण दिले जायचे. त्याकाळतही त्या विविध खेळ खेळायच्या.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांनी रचलेला इतिहास आणि इतिहासातील या पीडीत विधवा महिलांचा काष्टी साडीतील टेबल टेनिस खेळतानाचा फोटो काळाच्या प्रवाहासोबत बदलेल्या स्त्रियांच्या स्थीतीची साक्ष देतो.