ऑनलाइन लोकमत
नोएडा, दि. 21 - एका 25 वर्षीय महिलेने येथील पोलीस ठाण्यात आपला पती नपुंसक असल्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पती आणि सासरच्या मंडळींविरोधात फसवणुकीचा आरोप करत लग्नाच्यावेळी पती नपुंसक असल्याचे सांगितले नाही, असे या महिलेने म्हटले आहे. तसेच, तिने याप्रकरणी पतिकडून घटस्फोट आणि लग्नात करण्यात आलेल्या खर्चाची भरपाई करण्याची मागणी केली आहे.
नोएडा येथील सेक्टर 12 मध्ये ही महिला सध्या राहत असून नोव्हेंबर 2015 मध्ये तिने केंद्रीय विहारमधील सेक्टर 51 मध्ये राहणा-या एका व्यक्तीशी तिने लग्न केले. लग्नानंतर हनीमूनसाठी गोव्याला गेले. यावेळी या महिलेशी शारिरीक संबंध ठेवण्यास पती नकार देत होता, त्यावेळी तिला समजले की आपला पती नपुंसक आहे. या घटनेनंतर महिला काही दिवस आपल्या ऑफिसच्या कामात व्यस्त राहिली आणि तिने आपल्या पतीला डॉक्टरचा सल्ला घेण्यास सांगितले. मात्र, पतीने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, सुरुवातीला पती नेहमी दिवसा ऑफिसला जात होता. मात्र, लग्नानंतर रात्री उशिरा घरी येत होता आणि काही बोलायच्या आधीच झोपी जात होता. तसेच, ऑफिसच्या कामासाठी नाईट शिफ्टला जात होता, असा आरोप या महिलेने केला आहे.
दरम्यान, या महिलेने आपल्या आई-वडिलांना याबाबत सांगितले, असता दोन्ही कुटुंबीयांमध्ये यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पती एका चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेईल असे सासरच्या मंडळींकडून सांगण्यात आले. मात्र, याचा काही परिणाम झाला नाही आणि ही महिला आपल्या आई-वडिलांच्या सोबत राहायला गेला.
याप्रकरणी महिला पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंजू तेवतिया यांनी सांगितले की, आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 498 (अ) आणि 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आम्ही या जोडप्याला आधी चर्चेसाठी बोलविणार आहे.