साहिबाबाद- सोशल मीडिया व स्मार्ट फोनचा सगळीकडेच वारेमाप वापर केला जातो आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे नात्यांमधील तणावही काही प्रमाणात वाढताना दिसतो आहे. सोशल मीडियाच्या अती वापरामुळे पती-पत्नीमधील तणाव वाढल्याची अनेक उदाहरणही आहेत. टीएचए स्थानकात प्रत्येक दोन दिवसाला एका तरी जोडप्याची वादाची तक्रार दाखल होते. अनेकदा बऱ्याच महिलांच्या तक्रारी महिला हेल्प डेस्कवर सोडविल्या जातात. पण काऊंसिलिंग करूनही ज्यांचं समाधान होत नाही अशा वेळी पोलिसात तक्रार दाखल केली जाते.
उत्तर प्रदेशच्या साहिबाबादमध्ये घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय आहे. पतीने पत्नीबरोबरचा फोटो व्हॉट्सअॅपवर डीपी ठेवला नाही म्हणून पत्नी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहचल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही, तर पत्नीने तिच्या पतीवर छळाचा आरोप केला. पोलिसांनी काऊंन्सिलिंग केल्यावर तक्रारी मागील कारण समजलं. एक महिन्यापूर्वी या दाम्पत्याने फोटो काढले होते. पत्नीने त्या फोटोपैकी एक फोटो पतीला डीपी ठेवायला सांगितला होता. व्हॉट्सअॅपवर फोटो डीपी ठेवावा, असा हट्टच तिने केला होता. पण पतीला दोघांचा फोटो डीपी ठेवायचा नव्हता. एक महिना सांगूनही पतीने फोटो डीपी न ठेवल्याने वैतागलेल्या पत्नीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलीस स्टेशनमध्ये महिलेने पतीवर छळ करत असल्याचा आरोप केला. दरम्यान, पोलिसांनी काऊंन्सिलिंग केल्यावर पतीने त्याची चुकी कबूल करत तक्रार मागे घेतली.