अनेकदा असं होतं की, घाईघाईत बरेच लोक सकाळचं औषध सायंकाळी आणि सायंकाळचं औषध सकाळी घेतात. बरेच लोक औषधं घेताना अनेक चुका करतात. एका महिलेने तर अशी चूक केली ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल. अमेरिकेत एका 52 वर्षीय टिकटॉकरने खुलासा केला की, तिने व्हिटॅमिनची गोळी समजून चुकून पतीचे अॅप्पल एअरपॉड प्रो गिळला.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही घटना तेव्हा घडली जेव्हा रियाल्टार तन्ना बार्कर आपल्या मैत्रिणीसोबत सकाळी फिरायला गेली होती. इनसायडरच्या रिपोर्टनुसार, मैत्रिणीसोबत बोलताना ती तिची व्हिटॅमिनची गोळी घेत होती आणि चुकून तिने तिच्या पतीचा एक एअरपॉड प्रो गिळला.
बार्करने सांगितलं की, 'वॉक करताना अर्ध्या तासात मी माझी व्हिटॅमिनची गोळी घेण्याचा निर्णय घेतला. मग मला जाणवलं की, ते गळ्यात अडकलं आहे आणि मग मी पाणी प्यायले. नंतर फ्रेंडला बाय करून एअरपॉड पुन्हा कानात टाकत असताना लक्षात आलं की, माझ्या हातात एअरपॉड नाही तर व्हिटॅमिनची गोळी आहे. लगेच लक्षात आलं की, मी गोळी नाही तर एअरपॉड गिळलं'.
ती घरी पोहोचली तेव्हा तिने पतीला घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा त्याने याबाबत कुणालाही न सांगण्यास सांगितलं. अशात तिने या घटनेबाबत टिकटॉकवर माहिती देण्याचा निर्णय घेतला.
महिलेचा व्हिडीओ लगेच व्हायरल झाला आणि अनेक यूजर तिच्यासोबत घडलेल्या या घटनेने प्रभावित झाले. एका व्यक्तीने गंमतीने कमेंट केली की, 'जेव्हा ते बाहेर येईल तेव्हा ते एक एअरपुड झालेलं असेल'. दुसऱ्याने लिहिलं की, 'मी फक्त कल्पना करत आहे की, तुमची मैत्रीण तुम्हाला एअरपॉड खाताना बघत होती'. यानंतर महिला डॉक्टरांकडे गेली. तेव्हा ते म्हणाले की, एअरपॉड विष्ठेद्वारे बाहेर येईल.