woman begged and go home in luxury car: संयुक्त अरब अमीरातमध्ये भीक मागण्याची एक अशी घटना समोर आली आहे जी बघून अबूधाबी पोलिसही हैराण झाले. भीक मागणं संयुक्त अरब अमीरातमध्ये एक गुन्हा आहे. पोलिसांनी इथे एका भीक मागणाऱ्या महिलेला पकडलं. या महिलेकडे पोलिसांना एक लक्झरी कार आणि भरमसाठ पैसा सापडला.
ही महिला रोज शहरातील मशिदींसमोर भीक मागत होती आणि भीक मागून झाल्यावर ती घरी तिच्या लक्झरी कारने जात होती. महिला भीक मागत असल्याचा संशय एका व्यक्तीला आला होता. त्याने याची सूचना पोलिसांना दिली. खलीज टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, अबूधाबीतील एका व्यक्तीला संशय आला की, ही महिला शहरातील वेगवेगळ्या मशिदीवर जाऊन भीक मागते. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. मग पोलिसांनी तिच्यावर लक्ष ठेवलं आणि जे समोर आलं ते बघून ते हैराण झाले.
शहरातील वेगवेगळ्या मशिदीमध्ये महिला रोज भीक मागत होती. तिचं काम झालं की, काही अंतर ती पायी चालत जात होती. पोलिसांनी महिलेचा पाठलाग केला तेव्हा त्यांना समजलं की, महिलेकडे महागडी लक्झरी कार आहे. भीक मागितल्यानंतर महिला लक्झरी कार चालवत घरी जाते. पोलिसांनी महिलेला पकडलं तेव्हा तिच्याकडे मोठी रक्कम सापडली. महिलेविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.
दरम्यान यूएईमध्ये भीक मागणाऱ्यांना शिक्षाही दिली जाते. तीन महिने तुरूंगावास आणि पाच हजार दिरहम म्हणजे एक लाख 11 हजार रूपये दंड किंवा दोनपैकी कोणतीही एक शिक्षा दिली जाते.