अॅरिझोना: डेट करण्यासाठी पुरुष पुढाकार घेतात, असं तुम्ही ऐकलं असेल. पहिल्या डेटनंतर नातं पुढे नेण्यातही पुरुष जास्त उत्सुक असतात, असंही म्हटलं जातं. त्यासाठी मग फोनवरुन संपर्क साधून संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अॅरिझोनामध्ये याच्या अगदी उलट घडलंय. अॅरिझोनात राहणाऱ्या एका 31 वर्षीय महिलेनं पहिल्या डेटनंतर तब्बल 65 हजार मेसेज पाठवले. जॅकलिन अॅडेस असं या महिलेचं नाव आहे. 65 हजार मेसेजपैकी बहुतांश मेसेजमधून तिनं समोरच्या व्यक्तीला धमकी दिली होती. त्यामुळे जॅकलिनची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. जॅकलिन गेल्या उन्हाळ्यात एका पुरुषाला भेटली होती. या पुरुषासोबतचं नातं पुढे नेण्याची तिची इच्छा होती. त्यासाठी ती त्याला वारंवार मेसेज करु लागली. समोरुन फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं पाहून जॅकलिननं थेट धमक्या द्यायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे, ही महिला पुरुषाला भेटण्यासाठी थेट त्याच्या घरी पोहोचली. त्यावेळी तिच्या हातात चाकू होता. या घटनेचं सीसीटीव्ही पाहून संबंधित पुरुषानं या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. यानंतर जॅकलिनला अटक करण्यात आली. 'मला कधीही सोडून जाऊ नकोस. अन्यथा मी तुझा खून करेन,' 'मला तुझ्या रक्तानं आंघोळ करायची आहे,' असे धमकीपूर्ण मेसेज केल्यानं जॅकलिनला पोलिसांनी अटक केली.धमकी देणं, मानसिक छळ करणं, अशा आरोपांखाली जॅकलिन सध्या तुरुंगात आहे. वॉशिंग्टन पोस्टच्या प्रतिनिधीनं जॅकलिनशी तुरुंगात संवाद साधला. 'त्याला भेटल्यावर आयुष्याचा जोडीदार भेटला, असं मला वाटलं होतं. इतरांसारखंच आम्हीदेखील आयुष्यभर सोबत राहू, अशी इच्छा माझ्या मनात होती. आमचं लग्न होईल आणि पुढे सर्व छान होईल, असं स्वप्न मी पाहिलं होतं,' असं जॅकलिननं सांगितलं. मी त्याला माझं सर्वस्व मानलं होतं, असंही ती म्हणाली.
डोकं फिरलंया... पहिल्या डेटनंतर तिनं त्याला पाठवले ६५,००० मेसेज!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 2:30 PM