जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्णांच्या संख्येत देखील मोठी वाढ होत आहे. काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच जण या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. सर्दी-खोकला, ताप, घशामध्ये खवखव ही कोरोनाची सामन्य लक्षणं आहेत. याशिवाय वास न येणं, चव नकळणं याचा देखील आता लक्षणांमध्ये समावेश होतो. कोरोनाची लागण झाल्यानंतर अनेकांनी पदार्थांची चव कळत नाही अथवा वास येत नाही ही तक्रार केली. पण याता कोरोना एका महिलेसाठी वरदान ठरल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.
एका तरुणीला जन्मापासून कशाचाच वास येत नव्हता पण कोरोनाची लागण होताच मोठा चमत्कार झाला आहे. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेसाठी कोरोना ही महामारी चांगलीच फायद्याची ठरली आहे. लंडनमध्ये राहणाऱ्या नॅन्सी सिम्पसनला (Nancy Simpson) आयुष्यभर पश्चात्ताप होत होता की तिला कशाचाही वास येत नाही. नॅन्सीमध्ये जन्मापासूनच वास घेण्याची क्षमता नव्हती. कोरोनाचा संसर्ग होण्याआधी तिला फुलं, अन्न, अत्तर अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वेगवेगळा गंध असतो याबाबत माहिती नव्हती. कोणत्याही गोष्टीच्या वासाची कल्पना नव्हती.
"कोरोना झाल्यावर प्रत्येक गोष्टीचा वास येऊ लागला"
नॅन्सीवर कोरोना व्हायरसचा सकारात्मक परिणाम झाला आहे. जिथे अनेकांचं आयुष्य कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं. तिथे मात्र नॅन्सीच्या आयुष्यात या महामारीमुळे आनंद परत आला आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या वेळी नॅन्सी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. तिने स्वत:ला घरातच क्वारंटाईन केलं. तब्येतीत सुधारणा होत असताना एक दिवशी तिच्या लक्षात आलं की तिला प्रत्येक गोष्टीचा वास येऊ लागला आहे. द सन वेबसाईटशी बोलताना नॅन्सी म्हणाली की, पूर्वी तिला जेवणाची चव माहिती असायची पण वास येत नव्हता. मात्र कोरोनाची लागण झाल्यानंतर अन्नाचा वासही नॅन्सीला सहज येऊ लागला.
कोरोनामुळे आयुष्यात झाला चांगला बदल
लोकांसाठी ही खूप साधी गोष्ट असेल पण माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे असं देखील तिने म्हटलं आहे. नॅन्सीला 25 वर्षे कशाचाही वास आला नव्हता. आता तिला वास येऊ लागल्याने तिने आपलं घर फुलांनी सजवलं आहे. ती रोज भरपूर परफ्यूमही लावते. आता तिला फुलं, फळं यांचा वास घ्यायला खूप आवडतं. तिला या गोष्टीचा खूप आनंद आहे की आता ती प्रत्येक गोष्टीचा वास घेऊ शकते. कोरोनामुळे तिच्या आयुष्यात चांगला बदल झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.