बाळाचा जन्म होणं कोणत्याही जोडप्यासाठी आनंदाची गोष्ट असते. पण समजा बाळाचा जन्म एका रात्री अचानक झाला तर. काहीवेळा असंही होऊ शकतं की जन्म देणाऱ्या आईलाच माहिती नसतं की ती प्रेग्नेंट आहे म्हणून. विश्वास बसत नाहीये ना? एका महिलेच्या बाबतीत असं घडलंय. तिला माहितीच नव्हतं की ती प्रेग्नेंट होती.
मँचेस्टरमध्ये राहणाऱ्या Georgia Crowther या महिलेसोबत ही घटना घडली आहे. या महिलेला आजिबात कल्पना नव्हती, की ती चक्क नऊ महिन्यांची गरोदर आहे. १४ ऑगस्टच्या रात्री अचाकन तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या, तेव्हा त्यांनी अम्ब्युलन्स बोलावली. ॲम्ब्युलन्स यायला सहा तासांचा वेळ लागला. ती आली तोपर्यंत इकडे जॉर्जियाने बाळाला जन्म दिला होता. बाळाला पाहून जॉर्जिया आणि तिचा पार्टनर दोघेही कमालीचे आश्चर्यचकित झाले होते.
मँचेस्टर इव्हिनिंग न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षांची जॉर्जिया ही आपल्या २७ वर्षांचा पार्टनर केविनसोबत (Calvin) राहते. १४ ऑगस्टच्या रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर जॉर्जिया आणि केविन झोपायला गेले. रात्री अचानक जॉर्जियाच्या पोटात दुखू लागलं. मध्यरात्री तीन वाजता त्यांनी रुग्णवाहिका बोलावली, मात्र ती येण्यापूर्वीच जॉर्जियाची डिलिव्हरी झाली होती. तिला किंवा तिच्या कुटुंबीयांना जराही कल्पना नव्हती की ती प्रेग्नेंट आहे. यामुळे सर्वांनाच जन्मलेलं बाळ पाहून आश्चर्याचा धक्का बसला.
जॉर्जियाला आधीपासूनच एक मुलगी आहे. यानंतर जॉर्जिया बर्थ कंट्रोल पिल्स (Birth Control pills) घेत होती. या पिल्समुळे तिची मासिक पाळी येत नव्हती. साधारणतः प्रेग्नंट असल्यानंतर मासिक पाळी (missing periods) चुकते. मात्र, जॉर्जिया पिल्स घेत असल्यामुळे तिला कळलंच नाही, की आपली पाळी प्रेग्नंसीमुळे येत नाहीये. डिलिव्हरी झाल्यानंतर जॉर्जिया आणि तिच्या बाळाला रुग्णालयात नेण्यात आले. या दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. दरम्यान, जॉर्जियाचा हा किस्सा इंटरनेटवर अत्यंत चर्चेचा विषय बनला आहे.