(Image Credit : MyJoyOnline.com)
अलिकडे ब्रेकअपच्या वेगवेगळ्या घटना समोर येत असतात. रोमॅंटिक रिलेशनमधून बाहेर पडण्यासाठी म्हणजेच ब्रेकअप करण्यासाठी वेगवेगळे लोक वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना लावतात. कुणी बोलणं बंद करतं, कुणी नंबर डिलिट करतं तर कुणी समोरच्याला सांगूण ब्रेकअप करतं. पण चीनमधील एका महिलेने बॉयफ्रेन्डपासून पिच्छा सोडवण्यासाठी स्वत:च्या अपहरणाची आणि नंतर हत्येची कहाणी विणली. बरं हे सगळं तिने का केलं तर तिचा बॉयफ्रेन्ड गरीब होता.
ही घटना सेंट्रल चीनच्या Wuhan मध्ये राहणारी ३७ वर्षीय महिला यू ची आहे. यू हिला पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर खुलासा झाला की, तिनेच तिच्या अपहरणाची आणि हत्येची खोटी कहाणी पसरवली होती. यू ने सांगितले की, तिला तिच्या बॉयफ्रेन्डपासून पिच्छा सोडवायचा होता. कारण तिला कळालं होतं की, तो गरीब आहे.
बॉयफ्रेन्डचं घर पाहून झाली होती दु:खी
महिलेने सांगितले की, चायनीज न्यू इअरच्या दिवशी ती पहिल्यांदाच तिचा बॉयफ्रेन्ड लिनच्या घरी गेली होती. हे घर पाहूनच तिला कळाले होते की, लिन पैसेवाला नाही. त्यानंतर तिने त्याच्यापासून पिच्छा सोडवण्याचा निर्णय घेतला. पण यू ला वाटलं की, लिन हे नातं संपवण्यासाठी तयार होणार नाही. त्यामुळे तिने असा प्लॅन केला.
फोन करून म्हणाली मला वाचव...
गेल्या २१ फेब्रुवारीला लिनच्या घरून परत आल्यावर यू एका होस्टेलमध्ये जाऊन लपली. तिने लिनला फोन करून सांगितले की, तिच्या घटस्फोटीत पतीने तिचं अपहरण केलं आहे. तसेच मला येऊन वाचव असंही ती लिनला म्हणाली. यावेळी तिने ती हायवेजवळ कुठेतरी असल्याचंही सांगितली.
हे खोटं अपहरण खरं दाखवण्यासाठी यू ने किडनॅपर बनून लिनला अनेक मेसेज देखील केलेत. यात तिने लिहिले की, 'पोलिसांना काही सांगण्याची चूक करू नको. असं काही केलं तर मी यू ची हत्या करणार'. काही दिवसांनी पुन्हा लिनला मेसेज आला की, यू ची हत्या केली आहे आणि तिचा मृतहेद तलावात फेकला आहे'.
पोलिसांनाही बसला धक्का
किडनॅपरसोबत काही बोलणं होत नसल्याने लिनने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी यू चं तीन दिवसांपूर्वीचं लोकेशन काढलं. त्यानंतर पोलीस हॉस्टेलमध्ये पोहोचले तेव्हा यू तिथे आरामात टीव्ही बघत बसली होती. पोलिसांनी विचारपूस सुरू केली तेव्हा यू ने सांगितले की, लिनची गरिबी पाहून ती टेन्शनमध्ये आली होती आणि तिला त्याच्यापासून पिच्छा सोडवायचा होता. एका रिपोर्टनुसार, या महिलेला पोलिसांनी दहा दिवसांसाठी अटक केली आहे.