अनेकदा आपल्याला भूक लागलेली असताना घाईत स्वतःसाठी वस्तू विकत घेतो आणि थेट तोंडात टाकून खाणं-पिणं सुरू करतो. असंच काहीसं एका महिलेनं केलं, मात्र तिच्यासोबत मोठी दुर्घटना होता होता टळली. महिलेने मॅकडोनाल्डमधून आपलं आवडतं ड्रिंक टॉफी लॅट खरेदी केलं आणि ते प्यायला सुरुवात केली. यावेळी अचानक तिच्या तोंडात लोखंडी खिळा आला.
इंग्लंडमध्ये ही घटना घडली आहे. रॉटिंगडीनमध्ये राहणाऱ्या सेबल कार्ड नावाच्या महिलेसोबत ही घटना घडली आहे. सिंगल मदर सेबल कार्ड आपल्या मुलांसोबत फिरायला बाहेर पडली होती. दरम्यान, तिने ड्राईव्ह थ्रूद्वारे स्वत:साठी एक पेय खरेदी केलं होतं. 27 वर्षीय तरुणीने तिच्या तोंडात या पेयाचा एक घोट घेताच, तिच्या तोंडात लोखंडी खिळा आल्याने तिला काहीतरी विचित्र वाटलं.
महिलेचं म्हणणं आहे की, 1 इंच लांब लोखंडी खिळा तिच्या तोंडात येताच तिने स्टोअर मॅनेजरकडे तक्रार केली. त्या बदल्यात ते महिलेला दुसरं ड्रिंक देण्याचा प्रयत्न करत होते, मात्र या घटनेबद्दल जाणून तिथे उपस्थित सगळेच शॉक झाले. या महिलेनं सांगितलं की, जर तिच्या तोंडात हा खिळा वेगळ्या पद्धतीने गेला असता तर तिचा जीवही जाऊ शकत होता. एवढंच नाही तर ते लहान मुलांच्या पेयात गेलं असतं तर आणखीनच मोठी समस्या निर्माण झाली असती.
मॅकडोनाल्डने महिलेला £20 म्हणजेच सुमारे 2000 रुपयांचे व्हाउचर ऑफर केलं आणि तिची माफी मागितली. अमेरिकेतील मॅकडोनाल्डच्या नगेट्समध्ये झुरळ आढळल्यानंतर एका व्यक्तीने हे प्रकरण न्यायालयात नेलं होतं. त्या बदल्यात त्याला £20,000 म्हणजेच सुमारे 20 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून मिळाले. महिलेचं म्हणणं आहे की, तिला असं काहीही नको आहे पण हे तिच्यासाठी धक्कादायक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.