अनेक वेळा घराची साफसफाई करताना एखाद्याला आपल्या पूर्वजांची एखादी प्राचीन वस्तू सापडली आणि त्या व्यक्तीचं नशीब फळफळलं अशा घटना समोर येतात. असंच काहीसं पुन्हा एकदा घडलं आहे. घर स्वच्छ करताना एका जर्मन महिलेला तिने दोन वर्षांपूर्वी ठेवलेली अशी वस्तू सापडली, ज्यामुळे ती रातोरात श्रीमंत झाली.
महिलेने फेब्रुवारी 2021 मध्ये जर्मनीमध्ये लीगल लॉटरी सुपर 6 खेळली होती. तिने तिकीट डेस्क ड्रॉवरमध्ये ठेवलं आणि ती नंतर विसरली. 2023 मध्ये तिने घराची साफसफाई सुरू केली तेव्हा तिला हे जुनं तिकीट पडलेलं दिसलं. तिच्या तिकिटाचा क्लेम टाइम अद्याप बाकी आहे आणि तिने जवळपास 110,000 डॉलर (रु. 91 लाख) जिंकले आहेत हे जाणून ती थक्क झाली.
चार आठवडे खेळ खेळण्यासाठी तिने सुमारे $44 खर्च केले. न्यूयॉर्क पोस्टनुसार, महिलेने सांगितलं की, तिचा तिच्या नशिबावर विश्वास बसत नाही. जणू काही खजिना पुन्हा सापडला आहे. लॉटरी अधिकाऱ्यांनी जेव्हा तिकीट मिळालं, तेव्हा ते अगदी व्यवस्थित होतं.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये एकूण $660,000 पेक्षा जास्त जिंकलेल्या रकमेवर सॅक्सोनी-एनहॉल्टमध्ये अद्याप दावा केलेला नाही. या तिकिटावर 2021 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंत बक्षिसे मिळू शकतात. लोट्टो-टोटो सॅक्सोनी-एनहॉल्टचे संचालक स्टीफन एबर्ट म्हणाले "ती महिला खूप भाग्यवान होती कारण एवढ्या मोठ्या कालावधीसाठी हे एकमेव बक्षीस होतं."