एका कंपनीचे सर्व कर्मचारी ऑफिस पार्टीला गेले होते. मात्र या पार्टीत केवळ एका महिलेला आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. या घटनेनंतर ती महिला कर्मचारी न्यायालयात पोहोचली. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी झाली आणि महिलेला सुमारे ७० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले.
हे प्रकरण ब्रिटनमधील आहे. ५१ वर्षीय रिटा लेहर यांनी स्ट्रॅटफोर्ड येथील एस्पर्स कसिनोविरुद्ध न्यायाधिकरणाकडे तक्रार केली. त्या ठिकाणी ती कॅशिअर म्हणून कार्यरत होते. आपल्याला आपल्या सहकाऱ्यांनी एकटं सोडलं अशी तक्रार तिनं केली होती. आपल्या सर्व सहकाऱ्यांनी लास इगुआनासोमध्ये पार्टी केली. परंतु आपल्याला बोलावण्यात आलं नव्हतं असं त्या महिलेनं म्हटलं. महिलेनं कंपनीच्या विरोधात त्रास देणे, वय आणि स्पर्धा अशा गोष्टींमुळे भेदभाव केला जात असल्याची तक्रार केली होती.
रिटा लेहर यांनी २०११ मध्ये या ठिकाणी काम करण्यास सुरूवात केली होती. हा ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कसिनो आहे. या ठिकाणी जवळपास ५६० कर्मचारी कार्यरत आहेत. तपासादरम्यान त्यांना कसिनोच्या एका कर्मचाऱ्यानं धमकीही दिल्याची माहिती समोर आहे. कोणत्याही पुराव्यांशिवाय भेदभावाचा आरोप केला गेला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांना सांगण्यात आलं होतं. दरम्यान, त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि आर्थिक नुकसान भरपाई म्हणून कंपनीला ७० लाख रुपये देण्याचे आदेशही देण्यात आले.