एखाद्या व्यक्तीचं नशीब कसं, कधी अन् कुठे पालटेल याचा काही नेम नाही. एका रात्रीत काही जण करोडपती झाल्याच्या घटना याआधी समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका महिलेचं नशीब एका रात्रीत पालटलं असून एका लहानशा घरातून थेट अलिशान बंगल्याची ती मालकीण झाली.
कॅथरीन कारवाडाइन (Catherine Carwadine) नावाच्या 59 वर्षीय महिलेबाबत ही घटना घडली आहे. ही महिला हेल्थ डिपार्टमेंटमधून रिटायर्ड झाली. पण रिटायर्ड होण्याआधी ती रुग्णालयात फोस्टर मदर अर्थात आया म्हणून काम करत होती. या महिलेला स्वत:ची पाच मुलं आहे. ती आपल्या मुलांसह आणि पतीसोबत एका लहानशा घरात राहत होती. अशात तिचं नशीब पालटलं आणि रातोरात ती करोडपती झाली.
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, कॅथरीन कारवाडाइनने व्हॅलेंटाइन्स डेच्या दिवशी 20 पाउंड भारतीय रुपयानुसार जवळपास 2 हजार रुपये खर्च करुन Raffle लॉटरीचं तिकीट घेतलं. तिला या गोष्टींचा अंदाजही नव्हता की तिला लॉटरी लागेल. 1 एप्रिल रोजी तिला लॉटरी लागल्याचं समजलं. ती अतिशय खूश झाली. पण हे एप्रिल फूल असू शकतं असं तिला वाटलं. परंतु नंतर संपूर्ण तपास-पडताळणी केल्यानंतर कॅथरीनला खरोखरचं 30 कोटींचं अलिशान घर जिंकल्याचं समजलं.
कॅथरीन कारवाडाइनला लॉटरीत लागलेलं घर अलिशान आहे. घराजवळ एक आर्टिफिशियल तलावही आहे. त्याशिवाय थिएटर, गार्डन, पर्सनल सिनेमा हॉल, जीमसारख्या सुविधा आहेत. घराबाहेर जबरदस्त दृष्य आहे. लॉटरीत लागलेलं हे घर तिला पूर्णपणे मिळाल्यानंतर आता तिला घर भाड्याने देण्यास, घरात राहण्यास आणि विकण्याचाही अधिकार आहे. वयाच्या अशा वळणावर अचानक घर मिळाल्याने ती अत्यंत खूश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.