आपण सुंदर दिसावं यासाठी काही जण वाटेल ते करतात. यासाठी मेकअपशिवाय कॉस्मेटिक सर्जरीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. सुंदर दिसण्याच्या नादात केलेला भलताच प्रयोग अनेकदा अंगाशी येतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. छान दिसण्याच्या नादात तरुणीने आय़ब्रो ट्रीटमेंट केली पण भलताच परिणाम झाल्याची घटना आता समोर आली आहे. ट्रीटमेंटमुळे महिलेच्या चेहऱ्याला सूज आली. धक्कादायक बाब म्हणजे आकर्षक दिसण्याऐवजी ती भयंकर दिसू लागली.
मिशेल क्लार्क (Michelle Clark) असं या तरुणीचं नाव असून आयब्रो ट्रीटमेंट घेतल्याने तिच्या चेहऱ्यावर सूज आली. आपण अजून आकर्षक आणि सुंदर दिसावं यासाठी मिशेलने आयब्रो कलर करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पार्लरमध्ये तिच्याबरोबर अशी दुर्घटना घडली की यामुळे आपण जिवंत राहणार नाही, असं तिला क्षणभर वाटलं. जेव्हा ती आयब्रो वॅक्सिंग आणि कलर करून घरी परतली तेव्हा तिच्या आयब्रोमध्ये अॅलर्जी झाल्याची जाणीव झाली. काही तरी गडबड झालीय असं तिला वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर तिनं चेहरा पाहिला तेव्हा पूर्ण चेहरा सुजला होता. चेहऱ्याची वाईट अवस्था पाहून तिला मोठा मानसिक धक्का बसला.
मिशेलनं एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, "आयब्रो वॅक्सिंग आणि कलर केल्यानंतर माझ्या भुवया लालसर झाल्या होत्या आणि काही वेळातच भुवयांवरची त्वचा कोरडी पडून ती निघू लागली. त्यातून पू येऊ लागला. वॅक्सिंग आणि आयब्रोमुळे त्वचा पूर्णपणे भाजली होती. त्यामुळे त्वचेखालचं मांस दिसू लागलं होतं. चेहरा पूर्णपणे सुजला होता. आयब्रो वॅक्सिंग आणि कलर केल्यानंतर सलूनमध्येच माझ्या भुवयांची आग होऊ लागली होती. परंतु, ब्युटीशियनने त्यावर क्रिम लावलं आणि घरी जाण्यास सांगितलं. घरी आल्यानंतर माझ्या भुवया आणि जळजळ अधिकच वाढली होती. भुवयांना तीव्र खाज येत होती. त्यामुळे मला झोपही लागली नाही."
"मी दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे गेले असता त्यांनी माझ्यावर उपचार केले. मला सुमारे 3 ते 4 आठवडे भुवयांवर सुती कापड ठेवावं लागलं. त्यानंतर सुमारे 8 ते 10 आठवड्यांनी माझ्या चेहऱ्याची आणि भुवयांची स्थिती सुधारली. हा अनुभव माझ्यासाठी खूप भयानक होता. हा प्रसंग अन्य कोणत्याही महिलेवर ओढवू नये. महिलांनी नेहमीच प्रोफेशनल आयब्रो प्रॅक्टिशनर कडून ट्रीटमेंट घ्यावी किंवा मेकओव्हर करावा. अन्यथा अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. मला वेळेत उपचार मिळाल्यानं मी स्वतःला नशीबवान समजते" असं म्हणत मिशेलने आपला भयंकर अनुभव शेअर केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.