कामाच्या गडबडीत अनेकदा आपण स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. शरीराला होणारा त्रास आपल्याला किरकोळ वाटतो आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा मग त्यावर काहीतरी घरगुती उपचार करतो. पण कधी कधी असं वागणं हे जीवघेणं ठरू शकतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या तरुणीला देखील भयंकर अनुभव आला आहे. घशात खवखव म्हणून गरम पाण्याच्या गुळण्या करत राहिली आणि मेडिकल रिपोर्ट पाहून हादरली आहे.
जॉर्जिना असं या 24 वर्षांच्या तरुणीचं नाव आहे. खूप दिवसांपासून तिच्या घशात दुखत होतं. जॉर्जिनाला टॉन्सिलची समस्याही होती. बऱ्याच वेळा तिच्या घशात इन्फेक्शनही झालं होतं. त्यामुळे आपल्या घशातील वेदनाही टॉन्सिलमुळेच असाव्या असं तिला वाटलं. टॉन्सिलची समस्या समजून ती अँटिबायोटिक्स घेत होती, गरम पाण्याने गुळण्या करत होती जेणेकरून घशाला आराम मिळेल. उपचार करून जॉर्जिनाला बरं वाटलं नाही. उलट तिची समस्या अधिकच वाढली.
जॉर्जिना त्रास वाढताच डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी मेडिकल टेस्ट केल्यानंतर जे सांगितलं ते ऐकून तिला मोठा धक्काच बसला. ईस्ट सुर्री हॉस्पिटलमध्ये तिच्या काही वैद्यकीय तपासण्यात करण्यात आल्या. टेस्टमध्ये तिला myeloid leukaemia (APML) असल्याचं निदान झालं. हा एक कॅन्सर आहे. जॉर्जिनाच्या वडिलांना देखील हा कॅन्सर झाला होता, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
जॉर्जिनालाही इतक्या कमी वयात हा कॅन्सर झाला. आजाराचं निदान होताच जॉर्जिनाने तातडीने उपचार सुरू केले. आतापर्यंत तिच्या आठ किमोथेरेपी झाल्या आहेत. तिची प्रकृती आता हळूहळू सुधारते आहे. वेळेत कॅन्सरचं निदान झाल्याने वेळेत उपचार करता आले. आता जॉर्जिना याबाबत लोकांना जागरूक करत आहे. शरीरातील कोणत्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला तिने लोकांना दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.