दोरीउड्या मारणं अनेकांना आवडतं. तसेच ते आरोग्यासाठी चांगलं असतं असं देखील म्हटलं जातं. पण तुम्हाला जर कोणी या माध्यमातून म्हणजेच दोरी उड्या मारून पैसे कमवता येतात असं सांगितलं तर सुरुवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे, एक महिला दोरीउड्या मारूनच पैसे कमवत आहे. 30 वर्षांची लॉरेन फ्लायमॅन (Lauren Flyman) ही काम करून लाखो रुपये कमवत आहे. सोशल मीडियावर ती लॉरेन जम्प्स म्हणून लोकप्रिय आहे. लॉरेनला दोरीउड्या मारण्याची हौस आहे आणि स्किप रोपचे व्हिडीओ ती आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
द सन वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, लॉरेन याआधी एका सेल्स कंपनीत काम करायची. पण तिला आपलं काम आवडत नव्हतं. ती पूर्ण दिवस बाहेर असायची. 2020 साली पहिल्या लॉकडाऊनमध्ये तिला अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि ती बेरोजगार झाली. त्यावेळी ती घरीच होती आणि जीमही घरीच करायची. दोरी उड्या मारणं तिला फार कामाचं वाटत नव्हतं. पण घरी असल्याने ती स्वतःला बिझी ठेवण्यासाठी ते करायची. पाहता पाहता ती दोरी उड्या मारण्यात एक्सपर्ट झाली. ती वेगवेगळ्या पद्धतीने दोरीच्या उड्या मारू लागली.
सोशल मीडियावर तिने आपल्या स्किपिंग रोपच्या व्हिडीओसाठी एक वेगळं अकाऊंट ओपन केलं आणि तिथं आपले हे व्हिडीओ पोस्ट करू लागली. तिचे व्हिडीओ खूप प्रसिद्ध होऊ लागले. अनेक मोठ्या ब्रँड्सनी तिच्याशी आपले प्रोडक्ट्स विकण्यासाठी संपर्क केला. लॉरेनने या कंपन्यांशी टायअप केलं आणि आता त्यांचं सामान विकून पैसे कमवत आहे. लॉरेन आता सहा तास दोरी उड्या मारून पैसे कमवत आहे. सोशल मीडियावर ती यासाठी लोकप्रिय आहे. एका हिंदी वेबसाईटनेस याबाबतचे वृत्त दिले आहे.