आपलं घर तयार करण्यासाठी लोक छोट्या-मोठ्या गोष्टींचा विचार करतात. यासाठी खूप वेळही लागतो. कधी कधी स्वत:च घर तयार करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. अशा परिस्थिती अचानक जर कोणी येऊन घर उद्ध्वस्त केलं तर किती वेदना होतात असाच काहीसा प्रकार एका महिलेसोबत घडला. जेव्हा सुजेन हॉजसन सुट्टीवरून परतली तेव्हा तिला समजलं की तिचा अटलांटा येथील बंगला बुलडोझरने पाडला आहे. तिने WAGA-TV ला सांगितलं की, जेव्हा ती सुट्टीवरून परतली तेव्हा तिला तिच्या घराच्या जागेवर मातीचा ढिगारा दिसला.
"मी आता एका विचित्र परिस्थितीत अडकले आहे" असं हॉजसन म्हणाली. ती बाहेर असताना शेजाऱ्याने तिला कॉल केला आणि घर तोडण्यासाठी कोणतरी आलं आहे, तुम्ही कोणाला घर तोडण्यासाठी कामावर ठेवलं आहे का असं विचारलं. तिने यावर नाही असं उत्तर दिलं. पण इथल्या काही लोकांनी तुमचं संपूर्ण घर पाडलं आहे अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.
हॉजसनने सांगितलं की, फोनवर बोलल्यानंतर, जेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांनी कामगारांना विरोध केला, तेव्हा ते म्हणाले - तुम्ही तुमचं काम करा. यानंतर हॉजसनने एका नातेवाईकाला तिथे पाठवले, ज्याने कामगारांना घर पाडण्याच्या परवानगीचं पत्र मागितलं. पत्र पाहताच ते लोक चुकीच्या पत्त्यावर पोहोचले आणि चुकून घर पाडल्याचे निष्पन्न झाले.
हॉजसन म्हणाली की, "घर पाडले तेव्हा तेथे कोणीही नव्हते. आपण सर्वजण कर भरतो आणि आपण काहीही चुकीचे केले नाही, मग हे सर्व काय आहे? यासाठी जबाबदार असलेल्या लोकांचा एकही फोन मला आलेला नाही. घर दुरुस्त करण्यासाठी मी आता काय करावे हे समजत नाही. मला वाटतं की त्यांनी किमान आमची माफी मागावी आणि या सर्व खर्चाची भरपाई करावी." WAGA-TV ला दिलेल्या निवेदनात कंपनीने सांगितले की ते या प्रकरणाची चौकशी करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.