भारतात जास्तीत जास्त लोकांना तिखट-चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतं. घरातील पदार्थ असो वा बाहेरचे त्यात तिखटाशिवाय मजाच येत नाही. पण काही लोक असेही असतात ज्यांना मिरचीची एलर्जी असते. मिरची खाल्ल्याने त्यांना एलर्जी होते. पण आज आम्ही अशा घटनेबाबत सांगणार आहोत ज्यात मिरचीचा वास घेतल्याने एका तरूणी जीव जाण्याची वेळ आली होती.
मनुष्याचं शरीर फारच किचकट आहे. यात कधी काय कसं रिअॅक्ट होईल काही सांगता येत नाही. एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीमुळे फायदा मिळतो त्याच गोष्टीमुळे दुसऱ्याला नुकसानही होतं. असंच एका तरूणीला मिरचीचा वास घेणं महागात पडलं. इतकं की, ती गेल्या 6 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्येच आहे.
ब्राझीलमध्ये राहणाऱ्या थायस मेडेइरोस (Thais Medeiros) नावाच्या तरूणीने एका फार तिखट असलेल्या मिरचीचा वास घेतला. तिच्या आईने सांगितलं की, जेवण बनवण्यात ती मदत करत होती. यादरम्यान तिने तिखट मिरचीचा वास घेतला आणि मिरची नाकाला लावली.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, मिरचीचा वास घेतल्यावर तिच्या मेंदुवर गंभीर सूज आली. या घटनेनंतर ती अनेक दिवस कोमात राहिली. तिला नंतर हॉस्पिटलमधून सोडण्यात आलं होतं. पण नंतर पुन्हा ताप आल्याने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यावेळी तिच्या फुप्फुसात समस्या जाणवत होती. थायसच्या आईने सांगितलं की, आधीच तिला ब्रोंकाइटिस आणि अस्थमासारखे आजार होते.
6 महिन्यांपासून हॉस्पिटलमध्येच...
ही घटना याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात घडली होती. तिला 31 जुलैला डॉक्टरांनी घरी पाठवलं होतं. पण पुन्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तेव्हापासून ती अजूनही हॉस्पिटलमध्येच आहे. डॉक्टरांनी तिला एडिमाची समस्या असल्याचं सांगितलं. ज्यात मेंदुवर सूज येते. सध्या ती ना बोलू शकत ना चालू शकत.