वाहनांचा वेग वाढला की अपघातांची शक्यतादेखील वाढते. त्यामुळेच वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा अशा आशयाचे फलक आपल्या रस्त्याच्या कडेला पाहायला मिळतात. मात्र अनेकजण तरीही वाहनं वेगात पळवतात आणि अपघात होतात. मात्र एका महिलेच्या वाहनाला एका भलत्याच कारणामुळे अपघात झाला आहे. या महिलेचा कारनामा ऐकून अनेक जण हैराण झाले आहेत. अरे काय मूर्ख बाई आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेकांनी तिचा पराक्रम ऐकून दिल्या आहेत.
कार तब्बल १२० किलोमीटर प्रतितास वेगानं धावत असताना एका ३१ वर्षीय महिलेनं स्टेयरिंग सोडून दिलं. देवावरील आपली श्रद्धा तपासून पाहण्यासाठी महिलेनं हे कृत्य केलं. महिलेनं स्टेयरिंग सोडल्यानं तिचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर एका चौकात महिलेच्या कारनं एका दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली. यानंतर कार उलटली आणि एका विजेच्या खांबाला जाऊन आदळली. विशेष म्हणजे यावेळी महिलेसोबत कारमध्ये तिची मुलगीदेखील होती. मात्र देवावरील भक्ती तपासून पाहण्यासाठी महिलेनं स्वत:सह मुलीचादेखील जीव धोक्यात घातला.
कारवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झालावा असं उपस्थितांना वाटलं. पण या अपघातामागचा मूर्खपणा नंतर लोकांना समजला. कार चालवत असलेली महिला मद्यधुंद स्थितीत नव्हती. तिनं अंमली पदार्थांचं सेवनदेखील केलं नव्हतं. केवळ देवावरील श्रद्धा तपासून पाहण्यासाठी तिनं भरधाव कारचं स्टेयरिंग सोडलं. या अपघातात महिला आणि मुलगी जखमी झाल्या. त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. सुदैवानं त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. बेजबाबदारपणे गाडी चालवणे, लहान मुलीचा जीव धोक्यात घालणे अशा प्रकारचे गुन्हे संबंधित महिलेवर दाखल करण्यात आले आहेत.