खाण्या-पिण्यात प्रत्येकाचीच एक स्वत:ची चॉईस असते. काही जण खाण्यासाठी जगतात. तर काही जगण्यासाठी खातात. पण सतत फक्त एकच गोष्ट खाणं अनेकदा आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. जो सॅडलर असं एका 25 वर्षीय तरुणीचं नाव असून तिला एक असं व्यसन होतं जे समजल्यावर तुम्हीही हैराण व्हाल. ती गेली 23 वर्षे फक्त चिप्स आणि सँडवीचवरच जगली. आवडतात म्हणून तरुणी फक्त चिप्स-सँडवीच खायची. पण तिला आता ही सवय चांगलीच महागात पडली आहे.
25 वर्षांची जो सॅडलर वयाच्या दुसऱ्या वर्षापासून चिप्स आणि सँडवीच खायची कारण तिली त्याची चव फार आवडायची. एखाद्याला एखाद्या पदार्थाची एलर्जी असते. ज्यामुळे ती व्यक्ती तो पदार्थ खाऊ शकत नाही. पण जोच्या बाबतीच असं काहीच नव्हतं. वयाच्या दुसऱ्या वर्षी तिने चिप्स-सँडवीच खाल्लं आणि तिला त्याची चव इतकी आवडली की तेव्हापासून ती त्याशिवाय दुसरं काहीच खात नाही. अगदी नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तिचं हेच खाणं असायचं.
शाळेच्या लंचबॉक्समध्येही ती हेच पदार्थ घेऊन जायची. नाश्त्यात ड्राय सीरियल आणि लंचमध्ये क्रिस्प सँडवीच खाऊन ती जगत होती. सणासुदीला देखील ती चांगलं जेवण जेवायची नाही. पण तिच्यासाठी हे घातक ठरलं आहे. तिची ही सवय तिला आता भारी पडत आहे. तरुणीला मल्टीपल स्केलेरोसिस (Multiple Sclerosis ) हा आजार झाला. हा असा आजार आहे, ज्यामध्ये शरीरावर नियंत्रण राहत नाही. शरीर दुर्बल होत जातं. यामध्ये हेल्दी राहणं आणि त्यासाठी हेल्दी खाणं खूप गरजेचं आहे.
मिररच्या रिपोर्टनुसार, सॅडलरवर तिच्या खाण्यासाठी थेरेपी घेण्याची वेळ आली आहे. थेरेपीमार्फत ती आपलं डाएट हेल्दी बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तिला डाएटसाठी मदत करणारे तिचे थेरेपिस्ट डेव्हिड यांनी सांगितलं की, मल्टीपल स्लेरोसिस झाल्यावर ती आता फक्त चिप्स आणि सँडवीचवर नाही राहू शकत. तिला स्वतःला हेल्दी बनवण्याची गरच आहे. ती आता काही फळं आणि रस्सा असलेल्या भाज्या खाऊ लागली आहे. दोन-तीन सेशननंतर ती नवनवे पदार्थ खाण्याचा प्रयत्न करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.