कॅन्सरच्या लास्ट स्टेजला असलेल्या एका महिलेने रुग्णालयातच लग्न केल्याची अनोखी घटना समोर आली आहे. लग्नात महिलेने शेवटच्या श्वासापर्यंत पतीसोबत राहण्याची शपथ घेतली. यावेळी ती एका व्हीलचेअरवर होती. रुग्णालयातील नर्स आणि डॉक्टरांनी हा विवाह पाहिला. आयसीयूमधील एका नर्सने याला रुग्णालयाच्या सर्वोत्तम आठवणींपैकी एक आठवण असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यानंतरच महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. दोन दिवसांनी तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
नोरिना असं या महिलेचं नाव आहे. नोरिना आणि रेमन नवारो यांची भेट कॉमन फ्रेंड्सद्वारे झाली. त्यांनी 5 वर्षांपूर्वी डेट करायला सुरुवात केली होती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. जानेवारी 2020 मध्ये, नोरिनाला रेक्टल कॅन्सर झाल्याचे निदान झाले. तो चौथ्या स्टेजमध्ये पोहोचला होता. या वेळी रेमन नोरिनाच्या पाठीशी उभा राहिला. पूर्ण जबाबदारी घेऊन तो नोरिनाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेला.
नोरिना म्हणते की रेमनने तिला एक क्षणही जाणवू दिले नाही की तो तिच्यापासून दूर आहे. यामुळे नोरिनासाठी या आजाराशी लढणे थोडे सोपे झाले. या वर्षी नोव्हेंबरमध्ये, नोरिनाची प्रकृती आणखी बिघडली. गेल्या वर्षभरापासून दोघंही लग्न करण्याचा विचार करत होते. रेमनच्या डोक्यात विचार आली की, रुग्णालयामध्येच लग्न का करू नये? दुसऱ्या दिवशी सकाळी तो हा प्लान अंमलात आणण्यासाठी उठला. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याने नोरिनाला किस केलं आणि तिला त्याच दिवशी लग्नासाठी तयार होण्यास सांगितलं.
डॉक्टर आणि नर्सनी केलं सहकार्य
ही योजना अंमलात आणण्यासाठी डॉक्टर आणि नर्सच्या टीमने रेमनला मदत केली. नोरिनाने आधीच लग्नाचा ड्रेस खरेदी केला होता. रेमनने पटकन कुटुंब आणि मित्रांना लग्नाला येण्यास सांगितले. रुग्णालय हे लग्नाचं ठिकाण होतं. रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने नोरिनासाठी खास रुग्णालयातील बेडची व्यवस्था केली. या लग्नाला कुटुंब, मित्र आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह 25 सदस्य उपस्थित होते. लग्नसोहळ्यानंतर नोरिनाच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. नोरिनाला दोन दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता नोरिना तिच्या पतीसोबत आनंदाने राहत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"