आई होण्याचा अनुभव सर्वात खास आहे. आता प्रत्येक जोडपी खूप नियोजन करून या सर्व गोष्टी करतात. जर जोडप्याला मूल नको असेल तर ते वेगवेगळ्या पद्धतींद्वारे गर्भधारणा रोखतात. यामध्ये मॉर्निंग आफ्टर गोळ्यांपासून ते अनेक प्रकारच्या औषधांचाही वापर केला जातो. पण सध्या ऑनलाइन एक धोकादायक ट्रेंड सुरू झाला आहे. हा ट्रेंड (Weird Trend on Social Media) सोशल मीडिया साइट टिकटॉकच्या माध्यमातून सुरू झाला. यामध्ये लोक प्रेग्नंसी किटमध्ये (Pregnancy Kit) असलेली गोळी खाताना दिसले. ही गोळी प्रत्यक्षात गर्भनिरोधक गोळी असल्याचा दावा अनेकजण करत आहेत.
टिकटॉकवर बनवलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, प्रेग्नंसी किटमधील गोळी खाल्ल्यास ते गर्भधारणा रोखू शकतात. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर अनेक लोक हा ट्रेंड फॉलो करताना दिसले. पण आता यूकेमधील सर्जन डॉ. करण राजन यांनी लोकांना या ट्रेंडच्या परिणामाबद्दल सांगितलं आहे. चुकूनही ही चूक करू नका, असं ते म्हणाले. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप वाईट आहे, असंही त्यांनी सांगितलं.
प्रेग्नंसी किटमध्ये असलेली टॅब्लेट, ज्याला आपत्कालीन गर्भनिरोधक म्हटलं जात आहे, ती प्रत्यक्षात विषारी आहे. ही एक प्रकारची डिस्क आहे जी किटमध्ये भरलेली असते. ती किट कोरडे ठेवते. टिकटॉकवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोक प्रेग्नंसी किट फोडत असल्याचं दिसत होतं. यानंतर ते प्लॅन बी म्हणून यातील गोळी बाहेर काढून खात होते. ही मॉर्निंग आफ्टर पिलसारखीच गोळी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र असं करू नका, असा इशारा डॉ.करण राजन यांनी दिला. कारण हे धोकादायक आहे.
डॉ करण राजन यांनी सांगितलं की, प्रेग्नंसी किटमध्ये सापडलेली ही गोळी कोणत्याही प्रकारचा प्लॅन बी नाही. किटमधील ओलावा शोषून घेण्यासाठी ती यात ठेवली जाते. जसं सिलिका पॅकेट्स चप्पल आणि बॅग्सच्या आत पॅक केले जातात. डॉक्टर करणच्या मते, ही गोळी विषारी असू शकते. लोकांनी खोट्या दाव्यांसह व्हायरल होत असलेल्या व्हिडिओला फॉलो करण्यास सुरुवात केली. मात्र आता आरोग्य तज्ज्ञांनी ताकीद दिली असून लोकांनी तसं न करण्याचं आवाहन केलं जात आहे.