गढवा: देशातील कोरोना रुग्णांच्या सातत्यानं वाढ होत आहे. कोरोनाची दहशत अनेक भागांमध्ये पाहायला मिळत आहे. झारखंडच्या गढवामध्ये कोरोनाशी संबंधित एक अजब अफवा पसरली आहे. सूर्याची उपासना केल्यावर कोरोना विषाणूचा खात्मा होतो, अशी अफवा गावात पसरली आहे. ही एक अफवा कमी म्हणून की काय कलशावर आधार कार्ड ठेवून पूजा केल्यास मोदी सरकार बँक खात्यात पैसे पाठवतं, अशी आणखी एक दुसरी अफवा पसरली. यानंतर मेराल आणि मझीगावमधल्या महिला नदी किनारी जमल्या. त्यांनी कलशावर आधार कार्ड ठेवून सूर्याची पूजा सुरू केली. युरिया नदीच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन महिला कोरोना विषाणूचा खात्मा करण्यासाठी सूर्याची पूजा करत आहेत. याशिवाय गंगा मातेची आराधना करून कोरोना विषाणू वाहून न्यावा, अशी विनंती महिलांकडून करण्यात येत आहे. आधार कार्डची पूजा केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या खात्यात पैसे पाठवतील, अशी चर्चा गावात असल्याचं महिलांनी सांगितलं. त्यामुळेच आपण पूजा करत असल्याचं त्या म्हणाल्या. कोरोना संकट दूर करण्यासाठी सध्या महिला सूर्याची पूजा करत आहेत. पंतप्रधान मोदींनी बँक खात्यात पैसे जमा करावेत, यासाठी आधार कार्डची पूजा सुरू आहे. याबद्दल हासनदाग ग्रामपंचायतीचे सरपंच दुखन चौधरींकडे विचारणा केली असता, कोणीतरी गावात याबद्दल अफवा पसरवल्याचं त्यांनी सांगितलं. सूर्याची पूजा केल्यानं कोरोनाचा खात्मा होत नाही, आधार कार्डचं पूजन केल्यानं खात्यात पैसे येत नाहीत, अशा शब्दांत गावातल्या काही सुशिक्षितांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला कोणाचंही ऐकायला तयार नाहीत.
आधार कार्डची पूजा केल्यावर पंतप्रधान मोदी पैसे पाठवतात; गावात अफवा पसरली अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 7:21 PM