africa split: जगात आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका, असे 7 खंड आहेत. यापैकी आफ्रिका हे क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील दुसऱ्या क्रमांकाचे महाद्वीप आहे. 50 पेक्षा जास्त देश असलेल्या आफ्रिकेत जगातील सुमारे 16 टक्के लोक राहतात. 30 मिलियन चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेला हा खंड तीव्र गरिबी, खनिज संपत्ती आणि हिंसक संघर्षांमुळे सतत चर्चेत असतो.
आजकाल आफ्रिका खंडाची चर्चा वेगळ्याच कारणाने होत आहे. आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होण्याचा धोका वर्तवला जात आहे. केनियात घडलेल्या एका घटनेमुळे या चर्चेला अधिकच उधाण आले. 2018 सालचा मार्च महिना होता, जगाने एक विचित्र चित्र पाहिले. केनियाच्या दक्षिण-पश्चिम भागात अचानक जमिनीला मोठी भेग पडली.
हा क्रॅक सुमारे 25 मिलियन म्हणजेच अडीच कोटी वर्षांपूर्वी तयार होऊ लागला. आफ्रिकन खंडाच्या उत्तरेकडील तांबड्या समुद्रापासून दक्षिण-पूर्वेकडील मोझांबिकपर्यंतचा प्रदेश यात आहे. या संपूर्ण भागात भूकंप आणि ज्वालामुखीच्या हालचाली सतत होत राहतात, ज्यामुळे महाद्वीप तुटण्याची भीती आणखी वाढली आहे. पूर्वी असे मानले जायचे की, आफ्रिका एकाच टेक्टोनिक प्लेटवर आहे, परंतु कालांतराने आफ्रिक खंड दोन टेक्टोनिक प्लेट्सवर असल्याचे लक्षात आले. न्यूबियन आणि सोमाली, असे या प्लेट्सचे नाव आहे.
न्युबियन टेक्टोनिक प्लेटद्वारे सोमाली टेक्टोनिक प्लेट पूर्वेकडे खेचली जात आहे आणि त्यामुळे खंड दोन भागात विभागत असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. पण, सध्या घाबरण्यासारखे काहीच नाही. कारण, हा खंड दोन भागात विभागायला अजून हजारो वर्षे लागतील. सध्या राहणाऱ्या लोकांना याचा कोणताही धोका नसल्याचे तज्ञांचे म्हणने आहे.