World’s Largest Cashew Tree: जगात अशी अनेक झाडे आहेत जे लोकांना आकर्षित करतात. काहींना रंगीबेरंगी फुलं लागतात तर काहींना रंगीबेरंगी फळं लागतात. पण जगातील सगळ्यात मोठं काजूचं झाड कुठे आहे माहीत आहे का? जगातील सगळ्यात मोठं काजूचं झाड हे ब्राझीलमध्ये आहे. ब्राझील राज्य रियो ग्रांडे डो नॉर्टची राजधानी नेटाल (Natal) जवळ एका समुद्र किनाऱ्यावर ते आहे.
या झाडाला कॅश्यू ऑफ पिरांगी (Cashew of Pirangi) नावानेही ओळखलं जातं. हे झाड आकाराने इतकं विशाल आहे की, एखाद्या छोट्या जंगलाप्रमाणे दिसतं. याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स द्वारे जगातील सगळ्यात मोठं काजूचं झाड म्हणून मान्यता मिळाली आहे आणि हे झाड आणखी वाढत आहे. सध्या या झाडाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चला जाणून घेऊ या झाडाचा आकार इतका का वाढला?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर याचा एक व्हिडीओ @ccplus नावाच्या यूजरने शेअर केला आहे. याच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, हे एखाद्या जंगलासारखं दिसतं, पण मूळात हे केवळ एकच झाड आहे. त्यासोबतच व्हिडिओत झाडाची माहितीही सांगितली आहे.
वर्षभर या झाडापासून अनेक टन काजू मिळतात. सोबतच यावर एक अद्भूत फळंही लागतं जे लाल किंवा पिवळ्या रंगाचं असतं. त्यात तीन संत्र्यांच्या बरोबरीचे व्हिटॅमिन सी असतात.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या एका रिपोर्टनुसार, काजूचं हे झाड दोन एकर परिसरात पसरलं आहे. आकाराने ते 70 काजूच्या झाडांच्या बरोबरीत आहे. हे झाड 100 वर्षापेक्षा जास्त जुनं मानलं जात आहे. हे झाड 1888 मध्ये लुइस इनासियो डी ओलिवेरा नावाच्या स्थानिक मच्छिमाराने लावलं होतं.
असंही सांगण्यात आलं की, हे झाड इतक्या विशाल आकारात वाढण्याचं कारण जेनेटिक म्यूटेशन आहे. ज्यामुळे झाडाच्या पाच फांद्यांपैकी चार जेव्हा जमिनीला स्पर्श करतात तेव्हा त्यांची मूळं घट्ट होतात आणि त्यातून इतर फांद्या निघतात.