जगात फार आधीपासून पुस्तक लिहिण्याची परंपरा आहे. कोट्यावधी पुस्तकं जगात असतील. पण काही अशीही ऐतिहासिक पुस्तकं आहेत ज्यांबाबत हैराण करणाऱ्या गोष्टी समोर येतात. आजही अशी काही पुस्तकं आहेत ज्यातील रहस्य मनुष्यांना उलगडता आलेलं नाही. एका अशात रहस्यमय पुस्तकाबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हे पुस्तक 240 पानांचं आहे. पण हे आजपर्यंत कुणीही वाचू शकलं नाही, असं बोललं जातं.
इतिहासकारांनुसार, हे रहस्यमय पुस्तक 600 वर्ष जुनं आहे. कार्बन डेटिंगच्या माध्यमातून कळाले की, हे पुस्तक १५व्या शतकात लिहिलं गेलं आहे. तसेच हे पुस्तक हाताने लिहिलं गेलं आहे. पण यात नेमकं काय लिहिलंय आणि कोणत्या भाषेत लिहिलंय हे मात्र आजपर्यंत कुणाला समजू शकलेलं नाही.
हे पुस्तक आजही एखाद्या न सोडवता येणाऱ्या कोड्यासारखं आहे. या पुस्तकाला 'वॉयनिक मॅन्युस्क्रिप्ट' असं नाव देण्यात आलंय. तसेच या पुस्तकात मनुष्यांसोबतच अनेक झाडांचेही चित्र काढण्यात आले आहेत. पण आश्चर्याची बाब म्हणजे या पुस्तकात अशाही काही झाडांचे चित्र आहेत, जे पृथ्वीवर असलेल्या कोणत्या झाडांशी मिळते-जुळते नाहीत.
या पुस्तकाचं नाव 'वॉयनिक मॅन्युस्क्रिप्ट' हे इटलीच्या एका बुक डिलर विलफ्रीड वॉयनिक यांच्या नावावरून ठेवण्यात आलंय. असे मानले जाते की, त्यांनी हे रहस्यमय पुस्तक 1912 मध्ये कुठूनतरी खरेदी केलं होतं.
असे सांगितले जाते की, या पुस्तकाला अनेक पाने होती. पण काळानुसार याची अनेक पाने खराब झालीत. सध्या या पुस्तकाची केवळ 240 पाने शिल्लक आहेत. या पुस्तकात काय लिहिलंय याबाबत काही खास माहिती समोर आली नाही. पण यातील काही शब्द लॅटीन आणि जर्मन भाषेत असल्याचं समजलं.
अनेक लोकांचं असं मत आहे की, एखादं किंवा अनेक रहस्य लपवण्यासाठी हे पुस्तक असं लिहिण्यात आलं असावं. आता ते रहस्य काय आहे हे तर पुस्तक लिहिणाऱ्या लेखकालाच माहीत असेल. कदाचित येणाऱ्या काळात हे पुस्तक कुणी वाचूही शकेल.