World War 2 Plane: जगभरातील अनेक देशांमध्ये अनेकदा युद्ध झाले आहे. पण, दुसऱ्या महायुद्धाला सर्वात भीषण युद्ध मानले जाते. त्यात लाखो निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. विविध देशांचे हजारो सैनिकही त्यात मरण पावले. काही सैनिकांचा तर मृतदेहदेखील आजपर्यंत सापडले नाहीत. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अनेक विमानेही अचानक बेपत्ता झाली होती, ज्यांचा अनेक वर्षांनंतर सुगावा लागला आहे. असेच एक विमान समुद्राच्या तळाशी सापडले आहे.
अमेरिकन एअरमन वॉरेन सिंगर, 25 ऑगस्ट 1943 रोजी फॉगियाजवळील इटालियन एअरफील्डवर झालेल्या हल्ल्यादरम्यान बेपत्ता झाले होते. यावेळी ते P-38 लायटनिंग फायटर प्लेनमध्ये होते. 'द सन'च्या वृत्तानुसार, वॉरन कधीही त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले नाही. यूएस एअरफोर्सच्या रेकॉर्डनुसार, त्यांचे शेवटचे ठिकाण फोगियापासून 22 मैल दूर होते. विमानासह अचानक बेपत्ता झाल्यामुळे सर्वांनी त्यांना मृत मानले.
आता सापडले विमानाचे अवशेष सखोल चौकशीनंतर 26 ऑगस्ट 1944 रोजी वॉरेन सिंगरला मृत घोषित करण्यात आले. त्यांच्यासोबत काय झाले, हे रहस्य अनेक वर्षांनंतर उलगडले आहे. आता 80 वर्षांनंतर वॉरेन सिंगर ज्या विमानात होते, त्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, पाणबुड्यांना मॅन्फ्रेडोनियाच्या खाडीत 40 फूट खोल पाण्यात या विमानाचे अवशेष सापडले आहेत.
विमानाच्या अवशेषाची ओळख पटवणारे डायव्हर डॉ. फॅबियो बिस्किओटी म्हणाले की, विमान चांगल्या स्थितीत आहे आणि तांत्रिक समस्येमुळे हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. अपघातापूर्वी वॉरेन सिंगरने विमानातून उडी मारली, पण पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा. या विमानाच्या अवशेषात 50 कॅलिबर बुलेट आणि एक इंजिन क्रॅंककेसदेखील सापडला आहे. अपघात झाला तेव्हा वॉरन फक्त 22 वर्षांचा होते आणि 5 महिन्यांपूर्वीच मार्गारेट नावाच्या मुलीशी त्याचे लग्न झाले होते. या घटनेच्या एका वर्षानंतर मार्गारेटने एका मुलाला जन्म दिला. आता या विमानाचा शोध लागल्यावर सिंगरचा नातू म्हणतो की, वॉरन आपल्या सर्वांसाठी हिरो आहे.