World’s Biggest Private Jet: जगभरात अनेकांकडे खासगी विमान आहे, पण बोईंग 747-8 ची सर कुणालाही नाही. हे जगातील सर्वात मोठे खाजगी जेट असून, याला 'फ्लाइंग पॅलेस' असे नाव देण्यात आले आहे. प्रवास आरामदायक बनवण्यासाठी या विमानात सर्व सुखसोई देण्यात आल्या आहेत. सोन्याने सजवलेल्या बेडरुम, आलिशान बाथरुमसह मीटिंग हॉल अन् बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहेत.
डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, या आलिशान विमानात अनेक प्रशस्त मीटिंग रुम आणि डायनिंग रुम तसेच मास्टर सूटसह अनेक बेडरुम्स आहेत, ज्यामध्ये लोकांच्या सोयी लक्षात घेऊन सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या खोल्यांचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे. याशिवाय विमानात स्टोरेजसाठी भरपूर जागाही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, बेडरुममध्ये आरसे, बुडन फर्निचरसह इतर ठिकाणी सोनेरी सजावट करण्यात आली आहे.
या विमानाचे पहिले उड्डाण नोव्हेंबर 2005 मध्ये झाले होते. 224 फूट लांब पंख असलेला हा विशाल जेट एका वेळी 467 प्रवासी वाहून नेऊ शकतो. मात्र, या विमानात प्रवास करण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मोजावी लागेल. Simpleflying.com नुसार, बोईंग 747-8 विमान रिअल इस्टेट टायकून जोसेफ लाऊ (Joseph Lau) यांच्या मालकीचे आहे, ज्यांची एकूण संपत्ती £10.3 बिलियनपेक्षा जास्त असल्याचे मानले जाते.