(All Image Credit : Social Media)
सामान्यपणे तरूंगाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा वेगवेगळे प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असतात. म्हणजे तेथील सुरक्षा, कैद्यांना कसं जेवण मिळतं, ते कसे राहत असतील इत्यादी इत्यादी. अनेक सिनेमांमध्ये आपण पाहिलेलं असतं की, कैद्यांचं तुरूंगातील जगणं हे कुणाच्याही नशीबी येऊ नये. मात्र, क्यूबामध्ये एक असा तुरूंग आहे, जिथे या सर्व गोष्टींचा विचार करण्याला काहीच अर्थ उरत नाही. कारण या तुरूंगात एका कैद्यावर कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. त्यामुळेच हा तुरूंग जगातला सर्वात महागडा तुरूंग मानला जातो.
क्यूबातील या तुरूंगाचं नाव आहे ग्वांतानमो बे. ग्वांतानमो खाडीजवळ हा तुरूंग असल्याने याला ग्वांतानमो बे असं नाव देण्यात आलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, या तुरूंगात सध्या ४० कैदी आहेत आणि प्रत्येकावर वर्षाला साधारण ९३ कोटी रूपये खर्च केले जातात.
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, या तुरूंगात साधारण १८०० सुरक्षा रक्षत तैनात आहेत. इथे केवळ एका कैद्यामागे ४५ सैनिकांची नियुक्ती केली गेली आहे. या तुरूंगात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सैनिकांवर तर वर्षाला ३९०० कोटी रूपये खर्च केले जातात.
आता तुम्ही विचार करत असाल की, या तुरूंगात कैद्यांना एवढी सुरक्षा का दिली जाते? या तुरूंगात सर्वात धोकादायक गुन्हेगारांना ठेवलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड खालिद शेख मोहम्मद हा याच तुरूंगात कैद आहे.
या तुरूंगाच्या तीन इमारती आहेत. दोन गुप्त मुख्यालये आणि तीन हॉस्पिटल. त्यासोबतच इथे वकिलांसाठीही वेगवेगळे कंपाउंड तयार करण्यात आले आहेत. जिथे कैदी त्यांच्याशी बोलतात. येथील स्टाफ केद्यांसाठी चर्च आणि सिनेमा बघण्याची व्यवस्था देखील आहे. तर इतर कैद्यांसाठी जिम आणि प्ले स्टेशनची व्यवस्था आहे.
आधी ग्वांतानमो बे मध्ये अमेरिकेचा नेव्ही बेस होता. पण नंतर याला डिटेंशन सेंटर करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी इथे एक कंपाउंड तयार केलं होतं. ज्यात दहशतवाद्यांना ठेवलं जातं. या कॅम्पला एक्स-रे नाव देण्यात आलं आहे.