जगभरात असे अनेक लोक आहेत जे एक वेळच्या जेवणासाठी देखील दिवस-रात्र मेहनत करतात. महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असून आवश्यक गरजा पूर्ण करणं देखील आता कठीण झालं आहे. पण एक असं गाव आहे जे जगातील सर्वात श्रीमंत गाव आहे. या गावात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा आहे. विशेष म्हणजे हे जगातील सर्वात श्रीमंत गाव आपल्या देशात आहे.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात मधापार नावाचं हे श्रीमंत गाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मधापार गावात जवळपास 7600 घरं आहेत. तसेच सुमारे 17 बँका आहेत आणि येथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात तब्बल पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा आहे. म्हणजेच येथील प्रत्येक व्यक्ती हा करोडपती आहे. या गावात तुम्हाला प्रत्येक सुविधा मिळेल. बँकांसोबतच शाळा, कॉलेज, पार्क, रुग्णालय, मंदिर देखील आहेत. तसेच गावात एक अत्याधुनिक गोशाळा देखील आहे.
भारतातील इतर गावापेक्षा हे गाव नेमकं वेगळं कसं याचा विचार सर्वांच्याच मनात येतो. हे गाव खूप श्रीमंत असण्यामागे एक खास कारण आहे. येथील बहुतांश लोक परदेशात राहतात. त्याचबरोबर अनेक वर्षे परदेशात राहून काही लोक या गावात परतले असून इथे व्यवसाय करून भरपूर पैसे त्यांनी कमावले आहेत. यामध्ये ब्रिटन, अमेरिका, आफ्रिकेसह इतर देशातील लोकांचा समावेश आहे.
गावातील सुमारे 65 टक्के लोक एनआरआय आहेत. 1968 मध्ये लंडनमध्ये मधापार व्हिलेज असोसिएशनची स्थापना झाली, या माहितीवरून इथले लोक किती मोठ्या प्रमाणात परदेशात जातात याचा अंदाज येतो. या असोसिएशनची स्थापना तिथे यामुळे झाली कारण त्याठिकाणी मोठ्या संख्येने या गावातील लोक राहत होते. या सर्वांना एकमेकांशी जोडून ठेवण्यासाठी ही संघटनाही स्थापन करण्यात आली. आजही या गावातील लोक मोठ्या संख्येने परदेशात राहतात आणि हे लोक आपल्या कुटुंबियांना मोठी रक्कम पाठवतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.