‘अटक मटक चवळी चटक, उंची वाढवायची तर झाडाला लटक’- ज्यांची उंची कमी आहे, अशा मुला-मुलींसाठी पूर्वी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये हा फिशपाँड हमखास टाकला जायचा... त्यांची टिंगलही उडवली जायची. बरेचसे विद्यार्थी ही टिंगल तितक्याच दिलदारपणे आणि खिलाडूपणे घ्यायचे, हे खरं असलं तरी जे लंबूटांग आहेत त्यांचं काय?.. उंच लोकांची एवढी ‘हेटाळणी’ होत नसली, तरी बुटक्या लोकांपेक्षा उंच लोकांना नेहमीच जास्त आणि वास्तव अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यांचा हा तिढा त्यांचा त्यांनाच सोडवावा लागतो. अगदी ऑलिम्पिक विजेत्यांनाही या अडचणींतून बाहेर पडता आलं नाही. त्यातील काहीजणांसाठी तर त्यांची उंची हा त्यांच्या ‘आयुष्याचाच’ प्रश्न होऊन बसला आहे.त्यातलंच एक नाव आहे, रशियन मॉडेल आणि रशियाच्या बास्केटबॉल संघाची ऑलिम्पिक ब्रांझपदक विजेती खेळाडू इकाटेरिना विक्टोरोवना लिसिना. २००८ च्या ऑलिम्पिकमध्ये लिसिनाच्या रशियन संघाने बास्केटबॉल संघाने ब्रांझपदक जिंकले होते. बास्केटबॉल सोडल्यानंतर लिसिनानंतर मॉडेलिंगकडे वळली. तिच्या नावावर दोन गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आहेत. पहिलं रेकॉर्ड आहे, ते म्हणजे जगातील ती सर्वांत उंच प्रोफेशनल महिला मॉडेल आहे. दुसरं गिनेस बुक रेकॉर्ड तिच्या नावावर २००८ मध्ये नोंदलं गेलं, ते म्हणजे सर्वांत लांब टांगा असलेली जगातली सर्वात उंच महिला म्हणून! लिसिनाच्या डाव्या पायाची लांबी आहे १३२.८ सेंटिमीटर, तर उजव्या पायाची लांबी आहे १३२.२ सेंटिमीटर! याशिवाय सर्वांत लांब पाय असलेली रशियाची ती सर्वांत उंच महिला आहे.उंची वाढवण्यासाठी अनेक जण आयुष्यभर आटापिटा करत असले, तरी लिसिनासारख्या उंच लोकांना त्याचा अतिशय त्रास होतो. अगदी घरापासून ते बाहेर फिरतानाही प्रत्येक ठिकाणी त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातून मार्ग काढताना बऱ्याचदा तडजोड करावी लागते. कारण त्यांच्या या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसतं.अगदी स्वत:च्या घरात शिरतानाही त्यांनी खाली वाकून, मान खाली घालूनच आत जावं लागतं. झोपायला बिछाना पुरत नाही. टेबल, खुर्च्या, कपडे, चपला, बूट.. या साऱ्या गोष्टी अपुऱ्या पडतात. गाडीत बसायला गेलं, तर आत शिरता येत नाही, गुडघे वाकवून, मान खाली घालून अवघडल्या अवस्थेत बसावं लागतं. मार्केटमध्ये कोणतीच गोष्ट त्यांच्या मापाची मिळत नाही. त्यासाठी साऱ्या वस्तू त्यांना स्वत:च्या मापानं खास बनवून घ्याव्या लागतात. त्यासाठी खिसा मोकळा सोडावा लागतो. लिसिनाला या साऱ्या समस्यांचा अगदी लहानपणापासून सामना करावा लागला आहे.लिसिनाची खरी अडचण मात्र यापेक्षा खूपच वेगळी आणि मोठी आहे. लिसिना सध्या २९ वर्षांची आहे. तिच्या उंचीमुळे लाईफ पार्टनर मिळणं तिला अतिशय अवघड झालं आहे. लिसिना म्हणते, इतक्या वर्षांत ‘किमान लायकीचा’ एकही मुलगा मला मिळू शकला नाही. खरंतर कोणत्याही रिलेशनशिपमध्ये जात-पात-पंथ-रंग-उंची.. असल्या गोष्टींचा संबंध येत नाही, येऊ नये.. उंचीचा तर त्यात कुठल्याच अर्थानं संबंध येत नाही, पण अशा ‘विजोड’ जोडप्यांकडे लोक उपहासानं बघतात, त्यांची टिंगलटवाळी करतात. त्यातही बायकोपेक्षा नवरा जर उंचीनं कमी असेल, तर त्यांना अधिकच उपहासाला सामोरं जावं लागतं. माझ्या उंचीचा जोडीदार मला मिळावा, यासाठी मी कधीपासून शोधात आहे. आता माझ्यापेक्षा एक फुटानं कमी उंची असलेल्या तरुणाशीही डेटिंग करायला मी तयार आहे, पण तोही योग अजून आलेला नाही..”सर्व शक्यता तपासून झाल्यावर लिसिना आता डेटिंग ॲप्सवर जोडीदाराचा शोध घेत आहे.. लिसिनाचं म्हणणं आहे, प्रत्येक मुलीला जे वाटतं, तेच मलाही वाटतं.. मला असा जोडीदार हवा आहे, ज्याचं माझ्यावर प्रेम असेल, जो माझी काळजी घेईल, मला समजून घेईल.. आर्थिकदृष्ट्याही तो ‘उत्तम’ असेल, तर सोन्याहून पिवळं! लिसिनाला असा जोडीदार मिळेल की नाही, माहीत नाही, पण त्यासाठीचे प्रयत्न ती मनापासून करते आहे. आपल्या प्रयत्नांना एक ना एक दिवस यश येईल, इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेला आणि मेहनतीला फळ येईल, यावर तिचा भरोसा आहे..मेसीनं मोडलं लिसिनाचं रेकॉर्ड!जगातील सर्वांत उंच टांगा असलेली महिला म्हणून गिनेस बुक रेकॉर्ड लिसिनाच्या नावावर असलं तरी अमेरिकेच्या टेक्सास येथील एका १९वर्षीय टिनेजर तरुणीनं हे रेकॉर्ड अलीकडेच मोडलं आहे. तिचं नाव आहे मेसी कुरिन. तिचे पाय जवळपास दीड मीटर उंचीचे आहेत. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माहितीनुसार मेसीच्या डाव्या पायाची लांबी आहे १३५.२६७ सेंटिमीटर, तर उजव्या पायाची लांबी आहे १३४.४ सेंटिमीटर. यामुळे जगातील सर्वांत लांब टांगांची टिनेजर म्हणूनही मेसीची नोंद झाली आहे. दुसरं गिनेस रेकॉर्ड मात्र अजूनही लिसिनाच्याच नावावर आहे.
लंबूटांग ‘ऑलिम्पिक सुंदरी’ला मिळेना जोडीदार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 5:22 AM