आईच्या प्रेमाबद्दल बोलावं तितकं कमी आहे, आईच्या प्रेमाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. मग तो माणूस असो वा प्राणी. आई ही सारखीच असते. तिच्या बाळासाठी झटणारी, झगडणारी, त्याला हवं ते पुरवणारी आणि प्रसंगी आपले प्राणही देऊन त्याला नवजीवन देणारी. अशाच एका आईचा शोध लंडनमधल्या शास्रज्ञांनी घेतला आहे. एका कृमीवर हे संशोधन (Worm) करण्यात आलं, ज्यात आई मुलांना दूध पाजल्यानंतर मरते. दूध बनवण्याच्या प्रक्रियेत आणि मुलांना दूध पाजण्याच्या प्रक्रियेत आई कमकुवत होते आणि शेवटी मरते.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या (University College London) मते, ही प्रक्रिया नेमाटॉड कृमीमध्ये (Nematod Worm) सापडते. ही मादी अळी निस्वार्थीपणे आपल्या मुलासाठी दूध बनवते आणि नंतर मरते. आता या संशोधनाद्वारे हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो की, माणसांमधील वृद्धत्व कसं थांबवता येईल? या संशोधनाचे प्रमुख प्रोफेसर डेव्हिड जेम्स यांच्या मते, जर हे संशोधन यशस्वी झाले तर माणसांचं वृद्धत्व थांबवता येऊ शकतं.
ही कृमी कशाप्रकारे मरते?आतापर्यंत संशोधनात असे समोर आले आहे की, हे कृमी शरीरात एक विशेष प्रकारचे द्रव तयार करतात. हा द्रव पिवळ्या रंगाचा असतो. जो मादी अळीच्या आत तयार होतो. हा द्रव पदार्थ अम्लीय घटकांनी बनलेला आहे, जो आतल्या आत त्या कृमीचं शरीर खातो. यामुळे मादीचे शरीर सडण्यास सुरुवात होते आणि काही वेळातच तिचा मृत्यू होतो. याशिवाय, हे कीटक स्वतःच्या वजनापेक्षा जास्त अंडी घालतात हेही त्यामागंचं एक कारण आहे.
मृत्यूचं कारण नक्की काय?संशोधक म्हणतात की, हे कृमी त्यांच्या शरीरातील पोषक द्रव्यं त्यांच्या मुलांना हस्तांतरित करतात. हेच पोषक घटक या कृमींना जिवंत ठेवत असतात. पण एक मादी तिच्या बाळाला जिवंत ठेवण्यासाठी हे हस्तांतरित करते. यामुळे, अंड्यातून बाहेर आल्यानंतर मूल मजबूत होते, परंतु आईचा मृत्यू होतो. संशोधक आता या पद्धतीमागील प्रक्रिया जाणून घेण्यात गुंतलेले आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की ही प्रक्रिया समजल्यास माणसाची आयुमर्यादा वाढवणं शक्य आहे. त्यामुळे माणसं जास्त काळ जगु शकतात.