योगेश मेहेंदळे, ऑनलाइन लोकमत
सालाबादप्रमाणे यंदाही दही हंडी तोंडावर आली नी वाद विवादांना उधाण आलं. सुप्रीम कोर्टाने 20 फूटांच्या पेक्षा जास्त उंची असता कामा नये असे सांगत गोविंदांच्या व राजकीय पक्षांच्या अतिउत्साहाला लगाम घालायचा प्रयत्न केला, परंतु हिंदूंच्या सणांवर गदा का असा नारा देत दही हंडीचे उंच थर लावणारच असा पवित्रा मनसे व गोविंदा पथकांनी घेतला आहे. बुधवारी व्हॉट्स अॅपच्या ग्रुप्सवरही दही हंडीच्या थरांवर चर्चा रंगली आणि एका ग्रुपवर तर दही हंडीचा साहसी खेळात समावेश करावा, नियमावली ठरवावी आणि दही हंडी प्रीमियर लीग भरवावी अशी सूचना एका सदस्यानं केली. तर काही सदस्यांनी कृष्ण काय 9 थरांच्या हंड्या फोडत होता का, असा मुलभूत प्रश्न उपस्थित केला. व्हॉट्स अॅपपे रंगलेल्या अशा चर्चांची एक झलक...
मनोज - ब्रेकिंग न्यूज... दही हंडी 20 फूटाच्या आतच राहणार - सुप्रीम कोर्ट
राम - आतापर्यंत दहीहंडी मध्ये जखमी झालेल्या गोविंदांचे नंतर काय झाले ह्याबद्दल कुणाला काही माहित आहे का?
निखिल - ते बरबाद झाले सरकारी रूग्णालयात पडुन राहुन.
राम - आताच्या आरड्या ओरड्यात त्यांच्यावर स्टोरी झाली असती, तर त्यांना सहानुभूती आणि मदत मिळाली असती.
मोहनीराज - अगदी खरंय.
निखिल - त्याच्यात काय सेक्सी नाय. म्युनिसिपाल्टीच्या हास्पीटलात, दादरच्या बकाल चाळीत त्यांना कोण शोधेल. त्यापेक्षा बसल्या जागी जे कोट देतील त्यांची ष्टोरी पत्रकार करणार.
आशुतोष - आमच्या वर्गात पहिला येणारा मुलगा डॉक्टर झाला, अनेक वर्षे ससूनमध्ये काम करून आता अमेरिकेत आहे. एरवी कधीही व्हॉट्स अॅपवर नसतो, पण आज म्हणाला कोर्टाने उत्तम निर्णय दिलाय. खाली पडणाऱ्यांचे आयुष्य संपते, एका क्षणात...
निखिल - जे मोडुन पडलेत त्यांच्या बद्दल मला सहानुभुती नाही, ते त्यांच्या कर्माने मेलेत. पण त्यांची अजाणती पोरं यात देशोधडीला लागताहेत त्यांचंच वाईट वाटतं.
आशिष - माझा गोविंदांना पाठिंबा आहे. खेळ म्हणून दही हंडीला मान्यता मिळावी आणि उंच थर लावावेत. पण रस्त्यावर दही हंडी लावून ट्रॅफिकला अडथळा आणू नये. तसेच, पौराणिक व्यक्तिचा वाढदिवस म्हणूनही दही हंडी साजरी करू नये.
आशिष - धार्मिक बोजा म्हणून दही हंडी नसावी. गोविंदाना उंच थर लावण्याने नशा येतो, आणि त्याचे परिणाम भोगण्यास ते तयार असतात. 50 जणांनी रोज एकत्र येऊन सराव करणं, आणि एका ठराविक दिवशी त्याचं प्रात्यक्षिक करणं ही फार मोठी गोष्ट आहे, गोविंदामधला एकोपाही थक्क करणारा असतो.
आशुतोष - दही हंडी लीगचं आयोजन करा.
आशिष - बरोबर आहे, स्टेडियममध्ये करा दही हंडी.
राम - थोडक्यात म्हणजे, तुमचा नशा तुम्ही घ्या, जीव सांभाळून घ्या, सर्वसंमतीने घ्या आणि मुख्य म्हणजे, समाजाला त्रास होणार नाही हे बघून ही नशा करा.