भदोही – उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यात एक प्रियकर वधू बनून प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. सुरुवातीला मुलीच्या घरच्यांना कोणीतरी मैत्रिण भेटण्यासाठी आली असावी असं वाटलं. पण संशय येताच वधुच्या चेहऱ्यावरील घुंघट काढला तेव्हा प्रियकराची पोलखोल सगळ्यांसमोर उघड झाली. तेव्हा झालेल्या गोंधळात घराबाहेर आधीच बाईकवर असलेल्या दोघांनी युवकाला घेऊन पळ काढला.
भदोही जिल्ह्यातील एका गावात घडलेल्या या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. जिथे प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकरानं लग्नाच्या लाल जोड्यात नवरी म्हणून नटून आला. खांद्यावर लेडीज पर्स लटकवलेली तर पायात सँडल घातलं होतं. या प्रियकराला सुरुवातीला ज्यांनी ज्यांनी पाहिलं तेव्हा त्यांना ही नवी नवरी असल्याचं वाटलं. प्रियकरानं प्रेयसीला भेटण्यासाठी लढवलेली शक्कल पाहून सगळेच चक्रावले.
घुंघट काढल्यावर झाली पोलखोल
मंगळवारी दुपारी संधी मिळताच नवरीच्या वेषात प्रियकर प्रेयसीच्या घरात दाखल झाला. परंतु जेव्हा प्रेयसीच्या घरच्यांना शंका आली त्यांनी त्या नवरीला घुंघट काढण्यास सांगितले. तेव्हा प्रियकर पळण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडलं आणि त्याची चौकशी केली. तेव्हा काही जणांनी त्याला कानशिलात लगावून मारहाणही केली.
त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. घुंघटमध्ये मुलाचा चेहरा पाहून त्याची पोलखोल झाली. तेव्हा जवळच असलेल्या युवकाच्या साथीदारांनी त्याला बाईकवरून पळवून नेण्यात यशस्वी झाले. गावातील ही घटना असल्याने कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार केली नाही. परंतु प्रियकरानं प्रेयसीला भेटण्यासाठी लढवलेली शक्कल पाहून हा व्हिडीओ संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होत आहे.