केरळ - एखाद्या चित्रपटाचा प्रेक्षकांवर किती परिणाम होऊ शकतो हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे. बाहुबली चित्रपटात ज्याप्रमाणे प्रभास हत्तीच्या पाठीवर बसला होता, त्याचप्रमाणे एक युवक हत्तीच्या पाठीवर बसण्याचा प्रयत्न करत असताना हत्तीने त्याला सोंडेनेच काही फूट फेकून दिले. केरळमधील हा व्हिडिओ असून एक मद्यप्राशन केलेला व्यक्ती हत्तीच्या जवळ जातो. हत्तीला केळी खायला घालतो. हत्तीही सुरुवातीला त्याला काहीच करत नाही. हत्तीने आपल्या हातून केळं स्विकारलं म्हटल्यावर त्या इसमाने पुन्हा हत्तीच्या जवळ जात त्याच्या सोंडेचे चुंबन घेतलं. तरीही हत्तीने काहीच केलं नाही.
मात्र बोट पकडायला दिल्यावर लोक हातच पकडतात याच म्हणीप्रमाणे तो हत्तीच्या आणखी जवळ जात त्याच्या सोंडेवर बसून पाठीवर बसण्याचा प्रयत्न करत असताना हत्तीने त्याला सोंडेनेच दुरवर फेकलं. या व्यक्तीने दारुचं सेवन केलं असल्याने त्याने हत्तीपर्यंत जाण्याची मजल मारली. केळी खाऊ घालीपर्यंत त्याचे मित्र त्याला काही बोलत नव्हते, मात्र तो जेव्हा हत्तीच्या पाठीवर बसण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्याच्या इतर सहकारी मित्रांनी त्याला सावध केलं. मात्र मित्रांच्या आवाजाकडेही दुर्लक्ष करत तो हत्तीच्या आणखी जवळ गेला. त्यामुळे हत्ती जास्त चवताळला.
हत्तीने त्या इसमाचा अतिउत्साहीपणा बाहेर काढण्यासाठी सोंडेनेच काही फुटांपर्यंत फेकून दिले. त्याची शुद्ध हरपल्याचेही या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. एखादा चित्रपट आपण पाहतो, त्यातील स्टंट करण्याचा प्रयत्न अनेक प्रेक्षकांकडून केला जातो. मात्र हे स्टंट करताना प्रेक्षकांनी एक गोष्ट ध्यानात ठेवावी ती म्हणजे चित्रपटात दाखवण्यात आलेली चित्र ही तांत्रिकदृष्ट्या एडीट केलेली असतात. किंवा कधीकधी मार्गदर्शकांच्या निगरणाखाली शूट झालेली असतात. त्यामुळे चित्रपटातील सीन तुम्ही खऱ्या आयुष्यात करायला गेलात तर ती तुमच्या अंगलटही येऊ शकते.
सौजन्य - www.thenewsminute.com