Uttar Pradesh : उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील नगला चौबेमध्ये 29 जूनला सापाने दंश मारल्याने एका तरूणाचा मृत्यू झाला होता. त्याच्या साधारण 7 दिवसांनंतर मृत तरूणाच्या आईला स्वप्न आलं की, कबरेत दफन केलेला मुलगा जिवंत आहे. यानंतर तिने कबर खोदण्याचं काम सुरू केलं. प्रशासनाच्या परवानगीनंतर मंगळवारी कबर खोदण्यात आली. तेव्हा तरूणाचा मृतदेह आतच होता. बरेच दिवस झाल्यामुळे मृतदेहाची स्थिती खराब झाली होती. त्यानंतर लोकांनी पुन्हा माती टाकून मृतदेह दफन केला.
मीडिया रिपोर्टनुसार, गावातील 18 वर्षीय मुलगा योगेश 29 जूनला रात्री घरातील जमिनीवर झोपला होता. यावेळी त्याला सापाने दंश मारला. कुटुंबियांना हे समजलं तेव्हा ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतरही कुटुंबिय त्याला तांत्रिकाकडे घेऊन गेले. त्यानंतर योगेशचा मृतदेह गावातील हाथरस देवीच्या मंदिराजवळ दफन करण्यात आला.
मृत तरूणाची आई केला देवीनुसार, मुलाच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर तिला स्वप्न आलं होतं. स्वप्नात मुलाने तिला सांगितलं की, तो अजून जिवंत आहे आणि त्याला खड्ड्यातून बाहेर काढा. यावर तिचा तेव्हा तर विश्वास बसला नाही. पण हेच स्वप्न परिसरातील काही तरूणांना आणि महिलांनाही आलं. तसेच महिलेच्या 12 नातेवाईकांनाही हेच स्वप्न आलं. त्यामुळे आईचा ममता जागी झाली. तिने मुलाचा मृतदेह बाहेर काढण्याचा हट्ट धरला.
त्यानंतर कुटुंबिय जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि परवानगी घेऊन मृतदेह बाहेर काढण्याची तयारी केली. ज्या ठिकाणी त्याला दफन करण्यात आले होते तिथे पाणी भरलं होतं. अशात आधी तेथील पाणी काढण्यात आलं आणि मग जेसीबीने माती काढण्यात आली. तेव्हा मृतदेह तिथेच असल्याचं दिसलं. मृतदेह फुगला होता. त्यानंतर मृतदेह पुन्हा दफन करण्यात आला.