चेन्नई: व्हॅलेंटाईन डेला प्रेयसीकडून 'गिफ्ट' घेण्यासाठी चाललेल्या एका तरुणाची जबरदस्त धुलाई झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चेन्नईत हा प्रकार घडला. प्रेयसीला भेटण्यासाठी 22 वर्षांचा तरुण बुरखा घालून जात होता. त्याच्याकडे पाहून एका व्यक्तीला संशय आला. यानंतर तरुणाला रोखून बुरख्याबद्दल विचारण्यात आलं. मात्र त्याला समाधानकारक उत्तर देता आलं नाही. त्यामुळे चोर समजून जमावानं तरुणाला मारहाण केली. व्हॅलेंटाईन डेला प्रियकरानं प्रेयसीकडे किसची मागणी केली. मात्र त्यासाठी प्रेयसीनं एक अट घातली. रोयापेट्टाह ते मरिना हे अंतर बुरखा घालून आलास, तरच किस मिळेल, असं प्रेयसीनं सांगितलं. मरिनाजवळ पोहोचल्यावर तिथे स्पेशल गिफ्ट देईन, असं प्रेयसीनं सांगितलं होतं. त्यानंतर आयटीआय करत असलेला शक्तिवेल किस मिळवण्यासाठी बुरखा घालून मरिनाला जाण्यासाठी निघाला. मात्र तो मरिनाला पोहोचू शकला नाही. रस्त्यात 40 वर्षांच्या रिजवाननं त्याला पाहिलं. बुरखा घालून चालणाऱ्या व्यक्तीची चाल पुरुषी असल्याचं त्याच्या लक्षात आलं. बुरख्यातील व्यक्तीच्या चपलादेखील महिलेच्या नसल्याचं त्याच्या चाणाक्ष नजरेनं टिपलं आणि ही बाब त्यानं आसपासच्या लोकांच्या निदर्शनास आणून दिली. रिजवान आणि काहीजणांनी मिळून शक्तिवेलला अडवलं आणि त्याची चौकशी सुरू केली. आपण कोणतंही गैरकृत्य केलेलं नसल्याचं त्यानं सांगितलं. मात्र बुरखा का घातला, याचं उत्तर त्याला देता आलं नाही. त्यामुळे चोर असल्याच्या संशयातून जमावानं त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. शक्तीवेलनं पोलिसांना संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर त्यांनी मरिना भागात तरुणाची वाट पाहणाऱ्या तरुणीकडे याबद्दलची चौकशी केली. तेव्हा शक्तीवेल आपल्याला भेटण्यासाठी बुरखा घालून येणार होता, असं तिनं सांगितलं. यानंतर पोलिसांनी शक्तीवेलला घरी जाण्याची परवानगी दिली.
किस करण्यासाठी घातला बुरखा; चोर समजून प्रियकराची धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 5:43 PM