मुंबई- भारतातील एखादी संस्कृती, पदार्थ, पेहराव, भाषा अशा विविध गोष्टींची जागतिक पातळीवर दखल घेतली जाणं, ही प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे. भारतीय कलेचाही जागतिक पातळीवर गौरव होणं, यासारखी कौतुकास्पद बाब कुठलंही नाही. यामध्येच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. ती गोष्ट म्हणजे लुंगी. गेल्या एक दोन दिवसांपासून भारताच्या बऱ्याच राज्यांमधील पोषाखांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी ही लुंगी सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आली आहे. यावेळी ही लुंगी ट्रेंडमध्ये येण्याचं कारण म्हणजे त्या लुंगीची किंमत आहे.
भारतात फारशी ट्रेंडी न समजली जाणारी ही लुंगी परदेशात बरीच चर्चेत आली आहे.‘झारा’ या लोकप्रिय फॅशन ब्रँडमुळे ती चर्चेत आली आहे. अगदी लुंगीप्रमाणे लूक असणाऱ्या या नव्या स्टाईलच्या लुंगीला हटके टच देण्यात आला आहे. स्कर्ट पॅटर्नमध्ये समोरच्या बाजूला स्लीट असणारी ही नव्या पद्धतीची लुंगी एक नवा ट्रेंड आहे. या नव्या ट्रेंण्डच्या लुंगीला चांगलीच पसंती मिळते आहे. पण जर ही नव्या ट्रेण्डची लुंगी तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागणार आहे. सामान्य दुकानांमध्ये जास्तीत जास्त 300 किंवा 500 रूपयांना मिळते पण, ‘झारा’ ही फॅशनेबल लुंगी (स्कर्ट) ६९.९९ ब्रिटीश पाऊंडांना म्हणजेच भारतीय रुपयांनुसार जवळपास ८२०० रुपयांना विकत आहे.
या नव्या ट्रेण्डच्या लुंगीची इतकी किंमत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. नेटिझन्सने झाराच्या या नव्या ट्रेण्डी लुंगीला ट्रोलही करायला सुरू केलं आहे.