हैदराबाद - या जगात जुगाड करणारे लोक एकापेक्षा एक सर्रस भेटतील. तुम्हीही कधी ना कधी एक झुगाड केला असेलच. मात्र हैदराबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने Zomato वर असा काही जुगाड केला की तुम्हीही ऐकून थक्क व्हाल. झॉमेटो ही फूड डिलिव्हरी करणारी कंपनी आहे. या झॉमेटोच्या माध्यमातून ओबेश नावाच्या एका मुलाने असं काही केलं ज्याच्यामुळे तो सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे.
ओबेशने फेसबुक आणि ट्विटरवरुन या घटनेची माहिती शेअर केली आहे. त्याने सोशल मीडियात लिहिलंय की, रात्रीचे 11.30 वाजले होते. मी इनऑर्बिट मॉल रोडवर रिक्षासाठी थांबलो होतो. मात्र त्या परिसरात एकही रिक्षा मला मिळाली नाही. त्यानंतर मी उबेरवर कार बुक करण्यासाठी गेलो पण त्यावेळी माझ्या घरापर्यंत जाण्यासाठी 300 रुपये भाडे लागेल असं दाखविण्यात आले. मला प्रचंड भूकही लागली होती. त्यावेळी मी झॉमेटो अॅपमध्ये गेलो त्याठिकाणी माझ्या घराजवळचं फूड शॉप शोधणं सुरु केलं.
ओबेशने पुढे सांगितले की, मला एक डोसा शॉप माझ्या घराजवळ असल्याचं कळालं. मी झॉमेटॉवरुन डोसा ऑर्डर केला. तुम्हीही विचार कराल की या मुलाला घरी जायचं आहे. रिक्षा मिळत नाही मग हा फूड ऑर्डर कशा देतोय? मात्र ओबेशच्या डोक्यात भलताच विचार सुरु होता. एकाच निशाण्यात दोन पक्षी मारण्याचं त्याने ठरवलं. फूड शॉपवरुन झॉमेटो डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन ओबेशजवळ पोहचला. यानंतर खरा ट्विस्ट समोर आला. ओबेशने डिलिव्हरी बॉयला विचारलं तु पुन्हा त्या दुकानाजवळ चालला आहे का? यावर डिलिव्हरी बॉयने होकार दिल्यानंतर ओबेशने त्याला मला त्या दुकानाजवळ सोड असं सांगितले. त्यावर डिलिव्हरी बॉयही तयार झाला. अशाप्रकारे ओबेशने रिक्षाचे भाडेही वाचविले आणि आरामात डोसा खात घरी पोहचला.
घराच्या जवळ पोहचल्यानंतर डिलिव्हरी बॉय म्हणाला की, सर प्लीज मला 5 स्टार रेटिंग द्या. मी त्याला बोललो ठीक आहे. त्यामुळे झॉमेटोने मला फ्री राइड दिल्याबद्दल त्यांचे आभार आहे असं ओबेशने पोस्ट केलं. ओबेशची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यावर झॉमेटोनेही रिप्लाय करत सांगितलं की. आधुनिक समस्या सोडविण्यासाठी आधुनिक समाधानाची गरज आहे. तसेच अनेक युजर्स त्याच्या या कल्पनेला जबरदस्त प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे.