बुसान : दक्षिण कोरियात झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप २०२३ मध्ये भारताने इराणचा ४२ वि. ३२ गुणांनी पराभव करीत आठव्यांदा जेतेपदाला गवसणी घातली. भारताचा कर्णधार पवन शेरावतने सुपर दहा गुण मिळवीत विजयात मोलाचा वाटा उचलला. अशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेचे आतापर्यंत नऊवेळा आयोजन झाले आहे.
सामन्याच्या पहिल्या पाच मिनिटांतच भारताने इराणवर वर्चस्व मिळविले होते. दहाव्या मिनिटाला इराणचा संपूर्ण संघ बाद झाला. पवन शेरावत आणि अस्लम इनमादारने यशस्वी रेड केली होती. त्याचबरोबर, काही टॅकल पॉइंटही मिळविले. दमदार सुरुवातीनंतर भारतीय कबड्डी संघाने आपली लीड सहजरीत्या वाढविली. १९व्या मिनिटाला इराणला पुन्हा ऑल आउट केले.
मध्यांतरापर्यंत भारताने २३-११ अशी आघाडी घेतली. मात्र, इराणचा कर्णधार मोहम्मदरझा शादलोई चियानेह याने २९व्या मिनिटाला दोन रेड पॉइंट आणि सुपर रेडच्या जोरावर भारताला ऑल आउट केले. सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना, इराणनने भारताची आघाडी ३८-३१ अशी कमी केली. दडपण आले असताना भारतीय संघाने सामना ४२-३२ असा जिंकत आठवे विजेतेपद पटकावले.