जकार्ता - आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष कबड्डी संघासमोर उपांत्य फेरीत कडवे आव्हान उभे राहिले आहे. गुरूवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकात भारताला गतउपविजेत्या इराणचे आव्हान आहे. 2014च्या आशियाई स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला सुवर्णपदकाच्या लढतीत इराणने कडवी झुंज दिली होती आणि अवघ्या दोन गुणांनी भारताने हा सामना जिंकला होता. महिला संघासमोर चायनीज तैपेईचे आव्हान आहे.
भारतीय पुरुष संघाने अ गटात चार सामन्यांत तीन विजय मिळवून उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला, परंतु त्यांना दक्षिण कोरियाने एका गुणाच्या फरकाने पराभून करून धक्कादायक निकाल नोंदवला. आशियाई स्पर्धेतील भारताची 37 सामन्यांतील अपराजित मालिका या पराभवामुळे खंडीत झाली होती. पण, त्यातून सावरत भारतीय पुरुषांनी सुरेख खेळ करून उपांत्य फेरीतील जागा पक्की केली आहे. ब गटात इराणने पाचही सामने जिंकलेले आहेत. त्यामुळे भारतासमोर इराणचा हा विजयरथ रोखण्याचे कडवे आव्हान आहे.
महिला संघाने मात्र अ गटात चारही सामने जिंकले आहेत आणि त्याच उंचावलेल्या मनोबलाने ते उपांत्य फेरीत तैपेईचा मुकाबला करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण, तैपेईने गतउपविजेत्या इराणला नमवून आपली धमक दाखवली आहे आणि त्यांना कमी लेखण्याची चूक भारतीय महिलांसाठी धोकादायक ठरू शकते.