जकार्ता - भारत आणि इराण यांच्यातील कबड्डी सामन्याची चुरस पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. आशियाई स्पर्धेतील महिला कबड्डी संघाच्या अंतिम फेरीत हे दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी समोरासमोर येणार आहेत. गुरूवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतीय महिलांनी चायनीज तैपेइचा 27-14 असा सहज पराभव केला, तर इराणने थायलंडचा 23-16 असा पराभव केला.
भारतीय महिलांनी 2010 आणि 2014 च्या आशियाई स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. 2010 मध्ये भारताने थायलंडला नमवले होते, तर इराणला बांगलादेशसह संयुक्तपणे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र त्यांनी आपल्या कामगिरीचा स्तर उंचावलेला आहे आणि त्यांनी 2014 मध्ये अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आठ वर्षांचा आढावा घेतल्यास इराणची कामगिरी बरीच सुधारली आहे. त्यामुळे सुवर्णपदकाची हॅटट्रिक साधणे भारतासाठी इतकी सोपी गोष्ट नसेल.