पुणे : भारताबाहेर जपान, नेपाळ, भूतान, बांगलादेशासारख्या देशांमध्ये कबड्डीचा प्रचार आणि प्रसार करणारे शिवछत्रपती पुरस्कारविजेते माजी राष्ट्रीय खेळाडू अशोक कोंढरे यांचे मंगळवारी आजाराने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते.
किडनीला सूज असल्यामुळे कोंढरे यांना सुमारे दीड महिन्यांपासून रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच ४ दिवसांपूर्वी त्यांना हृदयविराकाराचा झटका आला. उपचार सुरू असतानाच मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालावली.
चढाईतील दादा खेळाडू म्हणून कोंढरे यांनी आपली कारकीर्द गाजविली. त्यांच्यामागे दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. नगरसेविका आरती कोंढरे यांचे ते सासरे होत. पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या नियामक मंडळाचे ते अध्यक्ष होते.कोंढरे हे राणाप्रताप संघाकडून खेळायचे. उंचपुरे आणि ताकदवान असलेले कोंढरे चढाईला आले की प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या उरात धडकी बसत असे. प्रेक्षकही आपल्या आवडत्या खेळाडूच्या प्रत्येक चढाईला भरभरून प्रतिसाद द्यायचे.
खेळाडू म्हणून निवृत्ती पत्करल्यानंतरही कोंढरे यांनी खेळाशी असलेली आवड जोपासली. त्यांनी नव्या दमाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू ठेवले होते. राज्य सरकारने त्यांना १९७६ मध्ये शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले होते.