- संतोष मोरबाळे अहमदाबाद : सांघिक खेळाच्या जोरावर येथील एरिना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायंट्सने यु मुम्बाचे आव्हान ३९-२१ असे परतवून लावले. माात्र, मुंबईच्या खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.आपल्या आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या यु मुम्बाची सुरुवात अडखळतच झाली. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या गुजरात फॉर्च्युन जायंट्सने पहिल्या आठ मिनिटांतच मुंबईवर लोण चढविले. स्टार खेळाडू अनुपकुमार व शब्बीर बाबू व नितीन मदने यांच्या चढायांना यश येत नसल्याचे पाहून मुंबईने काशिलिंग आडकेला मैदानात उतरविले. मात्र, तरीही गुजरातने पूर्वार्ध संपण्यापूर्वी मुंबईवर दुसरा लोण चढविला. पूर्वार्धात मुंबईला फक्त सहाच गुण मिळविले.गुजरातने चढाई व पकड या दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करीत पूर्वार्धात मुंबईवर २०-६ अशी भक्कम आघाडी घेतली होती. कर्णधार सुकेश हेगडे, रोहित गुलिया व सचिनने खोलवर चढाया करीत यु मुम्बाचा बचाव भेदला. मुंबईच्या खेळाडूंना आपली नेहमीची लय सापडत नव्हती. शब्बीरला आज एकाही गुणाची नोंद करता आली नाही. दुसºया सत्रात काशिलिंग अडके याने चांगल्या चढाया करीत संघाला काही गुण मिळवून दिले. मात्र, गुजरातच्या सांघिक खेळापुढे त्याचे प्रयत्न अपुरे पडले. गुजरातच्या अबोझर महोझरमिघानी याने मुंबईच्या खेळाडूंच्या पकडी करीत त्यांचे आव्हान परतवून लावले. मुंबईच्या प्रमुख खेळाडूंना बहुतांश वेळ मैदानाबाहेरच राहावे लागले याचा परिणाम त्यांच्या खेळावर झाला. सामना संपण्यास शेवटची काही मिनिटे बाकी असताना गुजरातने मुंबईवर तिसरा लोण चढवित विजयी ३७-२१ आघाडी घेतली.
गुजरात जायंट्स संघाचा यु मुम्बावर शानदार विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 1:05 AM