बंगळुरू : विनयभंगाचा आरोप असलेल्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे (साई) कबड्डीचे प्रशिक्षक रुद्राप्पा व्ही. होसमानी यांनी हॉटेलातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ते ५९ वर्षांचे होते.
‘साई’ प्रशिक्षण केंद्रातील एका मुलीचा विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. रुद्राप्पा बंगळुरूतील वरिष्ठ प्रशिक्षक होते. सोमवारी त्यांनी दावणगिरीपासून १५ किमीवर असलेल्या हरिहरा येथील एका हॉटेलात आत्महत्या केली. होसमानी १३ आॅक्टोबरला येथे आले होते; ते बराच वेळ बाहेर आलेच नाहीत. तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळविले. पोलीस आल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला असता ते गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. ९ आॅक्टोबरला ‘त्या’ मुलीच्या प्रसाधनकक्षात विनयभंग झाल्याची घटना घडली होती. मुलीने हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर साई प्रशासनाला माहिती देण्यात आली. तक्रारीची तातडीने दखल घेऊन साईने होसमानी यांना निलंबित केले. ‘त्या’ मुलीच्या पालकांच्या तक्रारीनुसार रुद्राप्पाविरुद्ध पोस्को कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. होसमानी यांच्या वडिलांनीही तक्रार केल्याचे पोलीस अधीक्षक आर. चेतन यांनी सांगितले.